फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव मार्गावरील पाथ्री येथील बस स्थानक परिसरात शनिवारी (दि.११) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव स्विफ्ट कार आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कारने वेगात येत असताना अचानक समोर आलेल्या ट्रॅक्टरला मागील बाजूने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहनांची गर्दी निर्माण झाली होती.
या अपघातात अशोक लक्ष्मण काकडे (वय ५०, रा. धानोरा, ता. सिल्लोड) हे किरकोळ जखमी झाले, तर जयश्री अशोक काकडे (वय ४८) यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली तसेच अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी तत्परता दाखवत दोन्ही जखमींना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे नेमके कारण वेग आणि अचानक समोर आलेले ट्रॅक्टर असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.