माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील तुळशी (मलकागुडा तांडा) येथील रहिवासी,त्रिपुरा २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी संदीप रेवाजी राठोड यांची केंद्र शासनाच्या प्रतिष्ठित जॉईंट सेक्रेटरी (Joint Secretary) पदावर नियुक्ती झाल्याने संपूर्ण तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे तुळशी गावासह माहूर तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.


माहूर ची पवित्र भूमी गुणवंतांनी भरलेली आहे.क्षेत्र कुठला ही असो,या देवभूमी चे भूमिपुत्र अग्रस्थानी राहिले आहे.संदीप राठोड यांनी अत्यंत जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत भारतीय प्रशासकीय सेवेत (भा.प्र.से.) स्थान मिळवले.शिवाय बंजारा समाजातील महाराष्ट्रातील ते पहिले (भा.प्र.से.) ठरले होते.त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर उत्कृष्ट कामगिरी बजावत आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडली आहे.संदीप राठोड ईशान्येकडील त्रिपुरा राज्यात जिल्हाधिकारी होते,तेव्हा त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत देशात सर्वोत्तम कार्य केले होते,ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप प्रभावित झाले होते.


केंद्र शासनाच्या संयुक्त सचिव या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत त्यांचा मोलाचा सहभाग राहणार असून, देशाच्या विकासात योगदान देण्याची मोठी संधी त्यांना प्राप्त झाली आहे.


त्यांच्या या यशाबद्दल तुळशी (मलकागुडा तांडा) गावात आनंदाचे वातावरण असून कुटुंबीय,मित्रपरिवाराने जल्लोष साजरा केला. विविध सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


युवा वर्गासाठी संदीप राठोड यांचे यश प्रेरणादायी ठरत असून,स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पदे मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.प्रशासकीय क्षेत्रात सर्वोच्च यश मिळवल्याबद्दल संदीप राठोड यांचं सकाळ समूहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.