तात्या लांडगे
सोलापूर : मागील पाच वर्षांत सोलापूर शहरात चेन स्नॅचिंगच्या १४२ घटना घडल्या. दुसरीकडे घरफोडीच्या ४६० तर वाहन चोरीचे साडेतेराशे, असे चोरीचे एकूण २२५७ गुन्हे पोलिसांत दाखल झाले. त्यात एकूण सुमारे ११ कोटींचा मुद्देमाल चोरीला गेला. अनेक घरे, दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ५५ ते ६० टक्के गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून केला.
सोलापूर शहरात दोन लाख कुटुंबे असून, शहराची लोकसंख्या १५ लाखांहून अधिक आहे. मागील पाच वर्षांत शहराचा विस्तार झाला, पण नव्याने वसलेल्या नगरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. शहराच्या गावठाण भागात देखील अशीच स्थिती आहे. त्यामुळे चोरटे अनेकदा नजर ठेवून, टार्गेटची माहिती घेऊन डाव साधतात. पोलिस घटनास्थळी पोचतात, त्यावेळी तेथे सीसीटीव्ही नाही किंवा तो बंद आहे, असे अनुभव येतात.
काही दिवसांपूर्वी सोलापुरातील ‘सनसिटी’तील एका घरात चोरी झाली होती, त्या ठिकाणी कॅमेरा होता पण त्यात व्हिडिओ शूटिंगच होत नव्हते. दोन दिवसांपूर्वी बाळे परिसरातील सुरवसे नगरात बंद बंगल्यात चोरी झाली, तेथे कॅमेराच नव्हता. त्या घरासमोरील दुसऱ्या घरात कॅमेरा होता पण तो सुरू नव्हता. अशावेळी पोलिस खबऱ्यांची मदत घेतात आणि चोरट्यांना शोधून काढतात. त्यावेळी खबरेच पोलिसांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम करतात.
नागरिकांनी सुरक्षेसाठी घरासमोर ‘सीसीटीव्ही’ लावावेत
सोलापूर शहरातील गुन्ह्यांचा विशेषत: चोरी, घरफोडीचा तपास करताना बहुतेक घरांत, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेच दिसत नाहीत. घर काही लाखांचे, घरात लाखोंचा ऐवज असतो, मात्र काही हजारांचा सीसीटीव्ही तेथे नसतो. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही असतात, पण ते बंद असतात किंवा त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग (बॅकअप) नसते. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.
- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सोलापूर शहर गुन्हे शाखा
‘चोरांच्या वाटा चोरट्यांनाच माहिती’
गुन्हेगारीत पडलेला प्रत्येकजण पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो, प्रत्येकाची स्वतंत्र माहिती असते. चोरी (घरात, वाहने, दागिने, मोबाईल, जनावरे असे), घरफोडी, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, दंगल घडविण्याचे प्रकार, सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवणारे, असे चोरटे-गुन्हेगार त्यात असतात. गुन्हेगारांना पकडून पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात, न्यायालयातून त्यांना शिक्षा होते. त्यानंतर काहीजण गुन्हेगाराची वाट सोडतात आणि बाकीच्या सर्वांवर पोलिसांचे नियमित लक्ष असते. गुन्हा घडतो तेव्हा पोलिस अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढतात. पोलिस त्याला ‘चोरांच्या वाटा चोरट्यांनाच माहिती’, असे म्हणतात.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.