वेल्हे : विद्युत शेतीपंपास पाणी कमी पडल्याने शेती पंप गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरामध्ये टाकताना पाण्यात मोठ्या भावाचा तोल जाऊन बुडत असल्याचे जाणवल्यानंतर छोटा भाऊ वाचवण्यास गेला असता दोन्ही सख्या भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात असलेल्या घेवंडे (ता. राजगड) गावच्या हद्दीत रविवार(ता.१२ ) रोजी दुपारच्या सुमारास घडली असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दामाजी भाऊ गायकवाड (वय.50 ) व दत्तू भाऊ गायकवाड (वय.55) दोघेही राहणार घेवंडे (ता. राजगड) या दोन्ही शेतकरी कुटुंबातील सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून लहान भाऊ दामाजी गायकवाड यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास राजगड, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले असून मात्र दुसऱ्या मोठ्या भावाचा दत्तू गायकवाड यांचा मृतदेह रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारापर्यंत मिळून न आल्यामुळे स्कुबा पथकास पाचारण करण्यात आले असून दुसरा मृतदेह पाण्यात शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.
घटनेची माहिती कळताच परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांकडून सुमारे सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर दामाजी गायकवाड यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले होते मात्र दत्तू गायकवाड यांचा मृतदेह हाती न लागल्याने तसेच अंधार पडू लागल्याने स्कुबा पथकाच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.
गुंजवणी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने धरण बॅक वॉटर परिसरामधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी असणारे अनेक विद्युत शेती पंप उघडे पडले असून शेतामध्ये असणाऱ्या पिकांसाठी तसेच झाडांसाठी पाणी आवश्यक असल्याने कित्येक शेतकरी हे विद्युत पंप गुंजवणी धरणाच्या पाण्यात टाकण्यासाठी काळजी न घेता धरणाच्या पाण्यामध्ये उतरत असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यापुढे अशी दुर्घटना होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर शेतकऱ्यांना तराफे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे यांनी सांगितले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.