सातारा : जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असं आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असं म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल असं मत मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केलं. पक्षात कुणालाही डावलण्याचा प्रयत्न केला जात नाही, असं म्हणत त्यांनी महेश शिंदेंना प्रत्युत्तरही दिलं.
शंभूराज देसाई हे आपल्याला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात, कोणत्याही कार्यक्रमांना आपल्याला बोलावलं जात नाही, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपणास कार्यक्रमासाठी बोलावले नाही, फोनही आलेला नाही, असा दावा महेश शिंदे यांनी केला आहे. त्यावर शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं.
साताऱ्यात शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यातील मतभेद तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडील सभांमधील बॅनर वाद आणि निमंत्रणाच्या मुद्द्यावरून हा संघर्ष अधिकच चिघळला असून, दोन्ही नेते आमने-सामने आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या दौऱ्यावेळी वेगळे निमंत्रण देण्याची पद्धत नाही. कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते, असे त्यांनी सांगितले. काही बॅनरवर महेश शिंदे यांचे फोटो नव्हते, मात्र त्यांना कार्यक्रमाची माहिती देण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले असल्याचेही शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं.
महेश शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलले, हा आरोप फेटाळताना शंभुराज देसाई म्हणाले की, अनेक बैठकीत त्यांनी स्वतः शिंदे उपस्थित आहेत का याची चौकशी केली आहे. जर त्यांना निमंत्रण मिळाले नाही, असा दावा केला जात असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
महेश शिंदे यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आल्याचे वक्तव्य केलं असेल ते शिवसैनिकांचा अपमान ठरेल, असे देसाई यांनी ठणकावले. जिल्ह्यातील सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे शिवसैनिकांच्या ताकदीवरच निवडून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला जनतेने बहुमत दिले असून 37 जागा जिंकत लोकांचा पाठिंबा मिळाल्याचे देसाई यांनी नमूद केले. जिल्ह्यात 100 हून अधिक लोकप्रतिनिधी निवडून आले असून ही शिवसेनेची ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच साताऱ्यामध्ये मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यामधील वाद वाढत आहे. या वादामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पक्षश्रेष्ठी या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.