महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि मुख्य भूमिकेची धुरा सांभाळली असून ट्रेलरमधील दमदार संवाद आणि दृश्यांनी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले आहेत. स्वराज्याच्या स्थापनेसाठी लागणारा विद्रोह आणि महाराजांचा जाज्वल्य इतिहास या ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती, जी आता या ट्रेलरमुळे शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट येत्या 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे रितेश देशमुखचा मुलगा या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तो या चित्रपटात बाल शिवरायांच्या भूमिकेत दिसणार असून, ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. जिओ स्टुडिओची उपकंपनी असलेल्या मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर प्रदर्शनानिमित्त मुंबईत एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित राहणार आहे. रितेश देशमुखचा दिग्दर्शक म्हणून असलेला हा भव्य प्रयत्न मराठी सिनेसृष्टीसाठी एक नवा मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.