विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केली असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याची भीती असते, त्यामुळे दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
उन्हाचा त्रास टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खालील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत –
घराबाहेर पडताना घ्यायची काळजी –
– दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे.
– बाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा पांढऱ्या सुती कापडाचा (दुपट्टा/शेला) वापर करावा.
– डोळ्यांच्या रक्षणासाठी गॉगल वापरावा आणि पायात चप्पल किंवा बूट असावेत.
आहार आणि पाण्याचे नियोजन –
– तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी.
– प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी सोबत पिण्याचे पाणी आवर्जून ठेवावे.
– शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लिंबू पाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचा वापर वाढवावा.
– दुपारच्या वेळी मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (Soft Drinks) पिणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
पेहराव आणि राहणीमान –
– हलके, पातळ, सच्छिद्र आणि पांढऱ्या रंगाचे सुती कपडे वापरावेत.
– घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
– घरामध्ये कुलर, पंखे किंवा एसीचा योग्य वापर करावा.
यांची विशेष काळजी घ्या –
– लहान मुले, गरोदर महिला, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्ती यांनी उन्हात जाणे टाळावे.
– पाळीव प्राणी आणि गुरेढोरे यांना सावलीत बांधावे आणि त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
– कामगारांना थेट सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी कामाच्या ठिकाणी योग्य सावलीची सोय असावी.
आरोग्याची तक्रार असल्यास –
– चक्कर येणे, मळमळणे किंवा अस्वस्थ वाटल्यास विलंब न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कापडाने झाकून ठेवावे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.