तळेगाव दाभाडे, ता. २१ ः आंद्रा जलवाहिनी प्रकल्पासाठी सुमारे ११८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून २०५८ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून ३२ एमएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय तळेगावला ‘सोलर सिटी’ बनविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांना करामध्ये १ टक्का सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच १०० बेडचे आधुनिक रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत देण्यात आली.
शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष संतोष दाभाडे, आमदार सुनील शेळके, उपनगराध्यक्ष गणेश काकडे तसेच नगरसेवक उपस्थित होते.
मागील चार महिन्यांतील कामांचा तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला. विविध प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचेही परिषदेत नमूद करण्यात आले.
सध्याची, पूर्ण आणि प्रस्तावित कामे
- पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तळेगाव स्टेशन येथे इंद्रायणी जलशुद्धीकरण प्रकल्प (३ एमएलडी) सुरू
- सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्याशाळेचे बांधकाम वेगाने सुरू
- गेली नऊ वर्षे रखडलेला हिंदमाता भुयारी मार्ग पूर्ण करून त्यावर डांबरीकरण
- सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावतळ्याजवळील प्रलंबित वाहिनीचे काम सुरू
- यशवंतनगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण, उर्वरित काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
- फेरीवाले, भाजी विक्रेत्यांसाठी तीन ठिकाणी स्वतंत्र झोन निश्चित
- लिंब फाटा ते स्टेशन चौक आणि बीएसएनएल ते मुंबई - पुणे मार्ग या प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण
- विद्युत वाहिन्या टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्याचा निर्णय
- लवकरच इयत्ता ११ वी कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू करण्यात येणार, पुढील वर्षी १२ वीचे वर्गही सुरू करण्याचा मानस
- भुयारी गटार योजनेचे सर्वेक्षण पूर्ण, नवीन अंदाजपत्रकावर काम सुरू, पूर्वीच्या ७३ कोटी रुपयांच्या योजनेतील अपूर्ण ३२ किलोमीटर काम पूर्ण करण्यासाठी नव्याने नियोजन
- सुमारे १५ कोटी रुपयांचे क्रीडा संकुल, नाट्यगृह उभारणीची परवानगी अंतिम टप्प्यात
- नवीन शाळांचे आराखडे, भूमिपूजन प्रक्रिया सुरू
- आंद्रा जलवाहिनी प्रकल्पासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून ५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण मंजूर
- सोमाटणे जलवाहिनी प्रकल्पातील अडचणी सोडवण्यावर भर, नवीन स्मशानभूमीची उभारणी
- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन विकास आराखडा ‘डीपी’ रस्त्यांसाठी पाठपुरावा सुरू
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.