सोलापूर: जिल्ह्यातील कुर्डूवाडीत भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांच्या वतीने अॅड. सुभाष हल्याळकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गुन्ह्यातील कलमे 7 वर्षांखालील असल्याने नोटीस देऊन अटक करायला हवी होती, असा युक्तिवाद मांडला.
सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद करत भोसले हा सराईत गुन्हेगार असल्याचे नमूद केले. तसेच त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या निर्णयामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता. पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
मनोहर भोसलेचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथे 27 एकरात पसरलेला आलिशान आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे. येथे दर अमावस्येला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असे. बाबाला भेटण्यासाठी 11 हजार रुपयांची फी घेतली जात असल्याचंही समोर आलं आहे.
या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही बातमी वाचा:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.