शनिवारचा (२५ एप्रिल) दिवस पंजाब किंग्सने क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरवला. आयपीएल २०२६ स्पर्धेत शनिवारी पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अविश्वसनीय विजय मिळवला.
पंजाबच्या या विजयात सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य (Prabhsimran Singh & Priyansh Arya) यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मोलाचा वाटा उचलला. सामन्यानंतर प्रियांश आर्यसोबत पंजाब किंग्सची संघमालकीण प्रीत झिंटाची (Preity Zinta) मस्ती करतानाही दिसली.
या सामन्यात केएल राहुलच्या नाबाद १५२ धावांच्या आणि नितीश राणाच्या ९१ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने २६४ धावांचा डोंगर उभा करत पंजाबसमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रभसिमरनने आणि प्रियांश या दोघांनी अत्यंत वेगात धावा करताना सलामीला ४१ चेंडूत १२६ धावांची भागीदारी केली.
प्रियांश आर्यने १७ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ४३ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने २६ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ७ षटकार मारले. त्यामुळे पंजाबने १८.५ षटकातच २६५ धावा केल्या.
पंजाबने हा सामना जिंकत इतिहास रचला. टी२० क्रिकेट इतिहासात हा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग ठरला. यापूर्वी इतक्या धावांचा पाठलाग टी२०मध्ये झाला नव्हता. पंजाब ७ सामन्यांनंतर आयपीएलमध्ये अपराजितही राहिले. त्यामुळे या ऐतिहासिक विजयानंतर पंजाब संघाकडून मोठे सेलिब्रेशन झाले.
सामना जिंकल्यानंतर प्रीती झिंटाही सेलिब्रेशनसाठी मैदानात आली. त्यावेळी ती पंजाबच्या खेळाडूंचं अभिनंदन करत होती. यावेळी ती प्रियांश आर्यजवळ आली आणि तिने गमतीने त्याच्या पोटात एक ठोसा दिला. त्यावेळी प्रियांशनेही चकीत होत वेदना झाल्याचे भाव चेहऱ्यावर आणले. हे मजा पाहून समालोचन करणारे रवी शास्त्रीही मस्करीमध्ये म्हणाले, 'ओह, तो जोराचा ठोसा होता.' या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, पंजाब किंग्सने ७ सामन्यांतील ६ विजय आणि एक रद्द सामना असे मिळून १३ गुण आत्तापर्यंत मिळवले असून पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक आहे. त्यामुळे पंजाबने आता प्लेऑफच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊस पुढे टाकले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.