पश्चिम बंगालमध्ये बुधवारी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदार आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष होत असल्याचे वृत्त आहे. अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले आहे. अनेक मतदारांनी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचे आरोप केले आहे. या सर्व घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. देशातील लोकशाही संपली, हेच निवडणूक आयोगाचे कामकाज सिद्ध करते, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक जिंकण्याच्या हव्यासाच्या ताकदीशी बंगालचा स्वाभिमान संघर्ष करत आहे. एकेकाळी लोकशाही असलेल्या या देशात, बंगालच्या नागरिकांचा छळ केला जात आहे आणि लाखो नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. तडजोड केलेल्या, पक्षपाती निवडणूक आयोगाने, एका विशिष्ट पक्षाला विजयी करण्यासाठी, बंगाली जनतेला बंदुकीचा धाक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशाचे रक्षण करण्याऐवजी आणि अशांत भागांत शांतता सुनिश्चित करण्याऐवजी, बंगालला घाबरवण्यासाठी लाखो केंद्रीय सुरक्षा दले तिथे तैनात केली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
एखाद्या परकीय आक्रमणाखाली असलेल्या राज्याप्रमाणे बंगालला वागणूक का दिली जात आहे? असा हिंदुस्थान कधीच नव्हता, तसेच ही लोकशाहीही नाही. या निवडणुकीचे आणि निवडणूक आयोगाचे कामकाज हेच सिद्ध करते की भारतीय लोकशाही आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. भीती आणि द्वेषाच्या माध्यमातून एखाद्या राज्यावर ताबा मिळवण्याचा हा एक संस्थात्मक प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
एखाद्या राज्यावर ताबा मिळवण्यासाठी संस्था, केंद्रीय यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा दलांचा गैरवापर केला जात आहे. या हव्यासाला आणि देशविरोधी व बंगालविरोधी धोक्याला बंगाल जनता सडेतोड उत्तर देईल. हा प्रश्न केवळ एका महिलेचा नाही, जी या परिस्थितीचा सामना करत आहे; तर हा प्रश्न बंगालचा, त्याच्या स्वाभिमानाचा आणि देशाच्या आदर्शांचा आहे! हा प्रश्न जगाच्या पटलावर एक लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाच्या विश्वासार्हतेचा आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.