डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक


प्रश्न : मी इंजिनिअर असून, एका नामांकित कंपनीत नोकरीस आहे. माझ्या लग्नासाठी घरच्यांनी स्थळे पाहायला सुरुवात केली. एका ठिकाणी पत्रिका जुळली आणि आमच्या काही भेटीही झाल्या. कुटुंबीयांबरोबरदेखील आम्ही भेटलो. त्यानंतर आमच्यात फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर नियमित बोलणे सुरू झाले. मला तो आवडू लागला. परंतु एक दिवस त्याने मला विवस्त्र फोटो पाठवण्यास सांगितले. मी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने ‘आपल्यात विश्वास निर्माण होऊ शकत नाही,’ असे सांगून नाते पुढे नेण्यास नकार दिला. मला आता खूप नैराश्य आले आहे. मी चुकीचे वागले का? माझ्या भावनांशी असा खेळ का झाला? यातून बाहेर कशी पडू?


उत्तर : कोणत्याही नात्यात स्वतःच्या मर्यादा आणि सुरक्षिततेचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. विवस्त्र फोटो पाठवण्यास नकार देणे हा तुझा निर्णय योग्य आणि स्वाभिमानी होता. तू अजिबात चुकीची वागलेली नाहीस.


नियोजित विवाहाच्या प्रक्रियेत मुलगा आणि मुलगी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पत्रिका जुळणे, भेटी होणे किंवा सोशल मीडियावर बोलणे याचा अर्थ लग्न निश्चित झाले आहे असे समजू नये. जोपर्यंत दोघांकडूनही स्पष्ट होकार मिळत नाही, तोपर्यंत भावनिक गुंतवणूक मर्यादित ठेवणे गरजेचे असते. हल्ली सोशल मीडियामुळे दोघे भावनिकदृष्ट्या लवकर जवळ येतात. पण प्रत्येक नाते आयुष्यभर टिकेलच असे नसते. त्यामुळे अशा वेळी स्वतःला दोष देण्याऐवजी हा अनुभव म्हणून स्वीकारणे महत्त्वाचे आहे.


योग्य जीवनसाथी शोधताना काही प्रसंग वेदनादायक असू शकतात; पण त्यामुळे आयुष्याबद्दल निराश होऊ नकोस. ही व्यक्ती तुझ्यासाठी योग्य नव्हतीच, हे लक्षात घे. सध्या स्वतःला वेळ दे, मन इतर सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतव. या अनुभवातून पुढे जाण्याचा प्रयत्न कर. तुला योग्य जोडीदार निश्चित मिळेल.


प्रश्न : माझे लग्न काही दिवसांवर आले आहे. आमचे ‘ॲरेंज्ड मॅरेज’ आहे. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, परंतु ‘प्री-वेडिंग’ चित्रीकरणादरम्यान काही छोट्या गोष्टींवरून आमच्यात मतभेद झाले. मला त्या वातावरणात काही गोष्टी करायला संकोच वाटत होता, तर त्याला माझ्याकडून अधिक मोकळेपणा अपेक्षित होता. त्यानंतर आमच्या संवादातही ताण निर्माण झाला. आमचे स्वभाव खूप वेगळे आहेत. तो मोकळा, बोलका आणि थोडा ‘ओव्हरथिंकिंग’ करणारा आहे. मी शांत आणि अबोल आहे. आता लग्न अगदी जवळ आले असताना मनात भीती निर्माण झाली आहे. पुढे आमचे पटेल का? हे लग्न करावे की मोडावे? असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आहे. मी काय करू?


उत्तर : लग्नाच्या अगदी काही दिवस आधी मनात असा संभ्रम निर्माण होणे ही अतिशय सामान्य आणि नैसर्गिक गोष्ट आहे. अनेक मुले-मुली या टप्प्यावर ‘मी योग्य निर्णय घेतो/घेते आहे का?’ हा प्रश्न स्वतःला विचारत असतात. अनेक चित्रपटांत हा विषय हाताळलेला असतो- शेवटच्या क्षणी वाटणारी भीती, गोंधळ आणि स्वतःशी होणारी झुंज!


तुझ्या बाबतीत जे मतभेद झाले, ते नाते तुटण्याइतके गंभीर नसून एकमेकांचा स्वभाव समजून घेण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत. तुझ्या होणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव मोकळा आणि व्यक्त होणारा आहे, तर तू शांत आणि अबोल आहेस. हे फरक चुकीचे नसून, योग्य प्रकारे समजून घेतले तर नात्याला पूरक ठरतात. ‘परफेक्ट’ जोडीदार नसतोच; एकमेकांना समजून घेण्याची तयारी असली की नाते सुंदर होते.


‘प्री-वेडिंग’ शूटमधील प्रसंग हा ‘विश्वासाचा प्रश्न’ नसून ‘कम्फर्ट झोन’चा मुद्दा आहे. प्रत्येकाची स्वतःची मर्यादा आणि सोय असते; ती ओळखून त्याचा आदर करणे महत्त्वाचे आहे. पण नेमके हेच तुझ्या होणाऱ्या जोडीदाराला जमले नाही आणि ते अनेक मुलांच्या लक्षात येत नाही. खरेतर लग्न हा केवळ एक सोहळा नसून दोन व्यक्ती आणि दोन विचारपद्धती एकत्र येण्याचा प्रवास आहे. हा प्रवास सहज व्हावा यासाठी विवाहपूर्व समुपदेशन खूप उपयुक्त ठरते. यातून एकमेकांच्या अपेक्षा, स्वभाव, जबाबदाऱ्या आणि मर्यादा समजून घेता येतात. एकमेकांशी संवाद कसा ठेवायचा, मतभेद कसे हाताळायचे, हे शिकता येते. पुढील आयुष्याचा आराखडा तयार करता येतो. म्हणूनच केवळ संभ्रमात राहण्यापेक्षा दोघांनी मिळून समुपदेशन घेणे हा अधिक परिपक्व आणि सकारात्मक निर्णय ठरू शकतो.


लग्न मोडणे हा पर्याय नाही. त्याऐवजी दोघांनी एकमेकांशी संवाद साधा, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. तू मन शांत ठेव, घाईत निर्णय घेऊ नकोस. योग्य तयारीने तुम्ही दोघेही पुढे गेलात तर हेच नाते तुमच्यासाठी सुंदर प्रवास ठरू शकते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.