भारताचा पुढील T20I कर्णधार अपडेट: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. 2026 च्या टी-20 विश्वचषक विजयानंतर भारतीय संघात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत असले तरी, कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मने निवड समितीची चिंता वाढवली आहे. दरम्यान, दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय (BCCI) आणि अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती टी-20 संघाच्या नेतृत्वात बदल करण्याचा गांभीर्याने विचार करत असून, संजू सॅमसनचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
विश्वविजेता कॅप्टन आऊट ऑफ फॉर्म!
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 2026 चा टी-20 विश्वचषक उंचावला असला तरी, वैयक्तिक कामगिरीच्या आघाडीवर तो चाचपडताना दिसत आहे. विश्वचषकात अमेरिकेविरुद्धची खेळी वगळता सूर्याला आपली छाप पाडता आली नव्हती. हीच घसरण आयपीएल 2026 मध्येही सुरूच आहे. चालू आयपीएल हंगामात सूर्याने 10 सामन्यांत 195 धावा केल्या आहेत, तर त्याचा स्ट्राईक रेटही 150 च्या खाली घसरला आहे. त्याच्या या खराब फॉर्ममुळे निवड समिती आता नवीन पर्यायाचा शोध घेत आहे.
दुसरीकडे, संजू सॅमसनसाठी 2026 हे वर्ष स्वप्नवत ठरत आहे. टी-20 विश्वचषकाच्या सुरुवातीला बाकावर बसलेल्या संजूने संधी मिळताच त्याचे सोने केले. वेस्ट इंडिज, इंग्लंड (उपांत्य फेरी) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या (अंतिम फेरी) महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याने खेळलेल्या खेळीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
संजूने हाच फॉर्म आयपीएलमध्येही कायम ठेवला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळताना त्याने 10 सामन्यांत दोन शतके आणि एका अर्धशतकासह 402 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 57.43 असून तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात त्याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे.
श्रेयस अय्यरचे नाव चर्चेत, पण…
कर्णधारपदासाठी पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. श्रेयसकडे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देण्याचा आणि दिल्ली व पंजाबला अंतिम फेरीपर्यंत नेण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र, श्रेयसच्या मार्गात एक मोठी अडचण आहे. त्याने डिसेंबर 2023 पासून भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. निवड समितीचे असे मत आहे की, श्रेयसने आधी संघात आपले स्थान निश्चित करावे, त्यानंतरच त्याच्या नावाचा कर्णधारपदासाठी विचार केला जाईल.
अहवालानुसार, आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून कायम ठेवले जाऊ शकते, मात्र त्याच्या कामगिरीवर निवड समितीचे बारीक लक्ष असेल. जर सूर्याचा फॉर्म सुधारला नाही, तर संजू सॅमसनकडे पूर्णवेळ नेतृत्व सोपवले जाईल. अशा परिस्थितीत संजू कर्णधार आणि श्रेयस अय्यर मधल्या फळीत सूर्याची जागा घेऊ शकतो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.