Zaheer Alam Passed Away: 90 च्या दशकातील सर्वाधिक हिट झालेल्या गाण्यांपैकी 'तुम तो ठहरे परदेसी,साथ क्या निभाओगे'या गाण्याचे सुप्रसिद्ध गीतकार जहीर आलम ( Zaheer Alam Passed Away) यांचे आज निधन झाले. नागपुरात ते वास्तव्यास होते. अल्ताफ राजा यांच्या आवाजातील हे गाणं 90 च्या दशकात तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं. आजही या गाण्याचा एक विशेष चाहतावर्ग आहे. या गीताचे गीतकार जहीर आलम यांच्या निधनाने हिंदी संगीत विश्वातील एक महत्त्वाचा आणि काळाच्या ओघात दुर्लक्ष झालेला हिरा कायमचा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने संगीत व साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 


'तुम तो ठहरे परदेसी ' गाण्याची अफाट लोकप्रियता


'तुम तो ठहरे परदेसी ' या एका कार्याने संगीत क्षेत्रात अनेकांना प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला मात्र या गीताचे मूळ शब्द रचणारे जहीर आलं यांचं आयुष्य प्रचंड आर्थिक विवंचनेत आणि उपेक्षित गेलं. नागपूरमधील मोमीनपुरा भागातील एका छोट्याशा घरात ते वास्तव्यास होते. गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरकरांच्याही विस्मरणात गेले होते.  एकेकाळी देशभरात सुपरहिट झालेलं हे गाणं सुरुवातीला स्थानिक पातळीवर गायले जात होते. मात्र गायक अल्ताफ राजा यांच्या खास शैलीत हे गाणं सादर झाल्यानंतर रातोरात या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती इतकी की हॉटेल्स, पानपट्ट्या, बस स्थानके, गल्लीबोळात हे गाणं ऐकू येऊ लागलं. एवढेच नाही तर 90 च्या दशकात अनेक कॉलेज, शाळांमधील गॅदरिंगमध्ये सुद्धा तरुण या गाण्यावर थिरकू लागली. 


गीतकाराचे संपूर्ण आयुष्य आर्थिक विवंचनेत


अफाट प्रसिद्धी मिळालेलं हे गाणं त्या काळात प्रत्येकाच्या ओठांवर होते. या गाण्यानं अल्ताफ राजा एका रात्रीत सुपरस्टार झाले. या म्युझिक कंपनीचा ही प्रचंड फायदा झाला. मात्र या गाण्याचे बोल लिहिणारे गीतकार जहीर आलम यांच्या वाटायला फारशी प्रसिद्धी, पैसा आला नाही. गीतकार जहीर आलम यांचं सगळं आयुष्य आर्थिक विवंचनेत आणि संघर्षातच गेलं. एम्प्रेस मिलमध्ये ते नोकरीला होते. मात्र, ही मिल नंतर बंद पडली आणि त्यांच्या आयुष्यात आणखी एक कष्टाची पायरी वाढली.  जहीर आलम यांच्या निधनाने नागपूरच्या संगीत व सांस्कृतिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या शब्दांनी देशभरात इतिहास घडला पण त्यांना आजवर मानसन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळालं नाही अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.