Aimim News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन इम्तियाज यांनी महापालिका प्रशासन, राजकीय नेते, आजी-माजी नगरसेवकांवर गंभीर आरोप केले होते. या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली होती.


या घोटाळ्याच्या दाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. इम्तियाज जलील यांनी महापालिकेकडे रमाई घरकुल घोटाळ्या संदर्भात काही पुरावे सादर केल्यानंतर या लाभार्थ्यांची पुनर्रतपासणी सुरू करण्यात आली होती.


महापालिकेने प्रसिध्द केलेल्या एका जाहीर प्रगटनाचा दाखला देत इम्तियाज जलील यांनी रमाई घरकुल योजनेत 90 टक्के भ्रष्टाचार झाल्याचा पुन्हा आरोप केला आहे. यामध्ये शिवसेना-भाजप नेत्यांचा हात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.


महापालिकेने जाहीर प्रगटनाद्वारे रमाई अवास योजना अंतर्गत 30 मे रोजी आॅनलाईन अर्ज मागवले होते. परंतु जे अर्ज आले त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आली नव्हती. तर बहुतांश अर्जदारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या. तर काही अर्जदारांचा कागदपत्रांवरून बांधकामाचा बोध होत नसल्याने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या समितीने घेतला आहे. यानंतर इम्तियाज जलील यांनी पुन्हा रमाई घरकुल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.


सलग तीन सर्वसाधारण सभांपासून महानगरपालिकेतील आमच्या एआयएमआयएम पक्षाचे नगरसेवक रमाई घरकुल योजनेतील मोठ्या घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत, परंतु सत्ताधारी पक्षांकडून हा विषय हेतुपुरस्सर टाळला जात आहे. आम्ही भक्कम पुराव्यांसह हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर, आता महापालिका प्रशासनाने दिलेल्या अधिकृत जाहिरातीद्वारे हे समोर आले आहे की, घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येकी 2.5 लाख रुपयांसाठी अर्ज केलेल्या 8540 अर्जदारांपैकी जवळपास 3 हजार जण मूळ कागदपत्रांसह आले होते.


धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा या लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासली गेली, तेव्हा त्यापैकी केवळ 850 कागदपत्रे खरी होती आणि बाकीची सर्व बनावट होती. तब्बल 90 टक्के लाभार्थी बनावट होते, ज्यांना एआयएमआयएमने हा भ्रष्टाचार उघडकीस आणला नसता तर ती रक्कम मिळाली असती. या घोटाळेबाजांवर प्रशासन काय कारवाई करणार आहे, याचे उत्तर आम्ही पुन्हा प्रशासनाकडून मागू. आणि ते पुन्हा टाळाटाळ करत आहेत, फक्त हे स्पष्ट करत आहेत की या घोटाळ्यात भाजप आणि शिवसेनेचे नेतेही सामील होते, असा आरोप इम्तियाज जलील यांनी आपल्या सोशल मिडियावरील पोस्टमधून केला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.