सचिन बनसोडे/सचिन जाधव| साम टीव्ही प्रतिनिधी


NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई केली आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले आहे. तिने अहिल्यानगरमधून अटक केलेल्या धनंजय लोखंडे याला मोठी मदत केल्याचा संशय आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा ही विद्यार्थ्यांना गाठून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत (NEET exam scam news) पोहोचवण्याचे काम करत होती. या कारवाईमुळे पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये अनेक छुप्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट होत आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले होते, ज्याच्या आधारे ही धरपकड करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांना पुरवायची 'एजंट'कडे


तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे ही विद्यार्थ्यांना शोधून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होती. अहिल्यानगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला तिने मोठी मदत केल्याचा संशय आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मनीषाकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या दोघांमधील संशयास्पद व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषाला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या (CBI) ताब्यात दिले जाणार आहे.


कोण आहे धनंजय लोखंडे?


NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. नाशिकमधून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर तपासात धनंजय लोखंडेचे नाव समोर आले होते. २६ वर्षीय धनंजय निवृत्ती लोखंडे हा मूळचा राहुरी तालुक्यातील माहेगाव (महाडूक सेंटर) येथील रहिवासी आहे. त्याचे वडील शाळेत लिपिक असून मोठा भाऊ डॉक्टर आहे.


पुण्यातून रॅकेटची सूत्रे?


धनंजयने दोन वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून बी.ए.एम.एस. (BAMS) चे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात वास्तव्यास होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने तिथेच प्रॅक्टिस सुरू केली होती. वैद्यकीय व्यवसायासोबतच तो मेडिकल ॲडमिशनसाठी 'कन्सल्टिंग'चे कामही करत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या शुभम खैरनारच्या जबाबानंतर फरार झालेल्या धनंजयला सीबीआयने राहुरी येथून रात्री उशिरा ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पेपरफुटीचे जाळे नेमके किती मोठे आहे आणि यात आणखी किती डॉक्टर्स किंवा एजंट सहभागी आहेत, याचा शोध आता सीबीआय घेत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.