शिरपूर : पंचायत समितीमध्ये निवेदन देताना ग्रामस्थ. --- आशा भरतीसाठी ठराव देण्यास नकार सरपंच व ग्रामसेवकाविरोधात तक्रार, कायदेशीर कारवाईची मागणी सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. १५ ः आशा स्वयंसेविका भरतीसाठी उमेदवाराला ठराव देण्यास नकार दिल्याने महादेव दोंदवाडा (ता. शिरपूर) येथील सरपंच व ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, शिस्तभंगासह कायदेशीर कारवाईची मागणी केली. ग्रामस्थांनी १२ मेस गटविकास अधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आशा स्वयंसेविका पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यात महादेव दोंदवाडा गावासाठी एक जागा आहे. या पदासाठी अर्ज व अन्य कागदपत्रांसोबत ग्रामपंचायतीचा ठरावही आवश्यक असतो. तथापि गावातील महिलांना तसा ठराव देण्यास ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता पावरा व ग्रामसेवक विजय पाटील जाणीवपूर्वक नकार देत आहेत. ‘तुम्ही कोणाकडेही तक्रार करा, मी ठराव देणार नाही’, असे संबंधित महिलांना सुनावण्यात आले. याबाबत ५ मार्चलाही गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली नाही. स्वतःच्या मर्जीतील महिलेस आशा स्वयंसेविकेचे पद मिळवून देण्याच्या हेतूनेच इतर महिलांना डावलले जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी वर्तविला आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग केला जात असून, या प्रकरणाची तत्काळ चौकशी करावी, उभयतांना समज देऊन दाखले देण्याचे आदेश करावेत, पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काजल पावरा, नीतेश पावरा, देवीलाल पावरा, दीपक पावरा, सागर पावरा, सुरत पावरा, लक्ष्मण पावरा आदींनी निवेदनातून केली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.