NGL26B03894 निमगूळ ः अपघाताची पाहणी करताना पोलिस निरीक्षक दिनेश सोनवणे व सहकारी. --- निमगूळ-टाकरखेडा रस्त्यावर अपघात; मोटारसायकलस्वार गंभीर जखमी निमगूळ, ता. १५ : येथील रहिवासी भानुदास नामदेव शिंदे (वय ५२) हे कामानिमित्त गुरुवारी (ता. १४) रात्री नऊच्या सुमारास निमगूळहून टाकरखेडाकडे जात होते. दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या लिंबाच्या झाडाच्या फांदीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, डोक्याच्या भागात रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोंडाईचा-टाकरखेडा रस्त्यावर झाडे जाळण्याचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. चारीतील काटेरी झुडपे व बाभळीची झाडे जाळताना आग मोठ्या झाडांपर्यंत पोहोचत असून, त्यामुळे झाडे पोकळ होऊन रस्त्यावर कोसळत आहेत. परिणामी, या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. भर उन्हाळ्यात चारीत आग लावल्याने आगीचे प्रमाण वाढत असून, रस्त्यालगतची मोठी झाडेही आगीच्या विळख्यात सापडत आहेत. काही वेळात ही झाडे कोसळून वाहतुकीस धोका निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघातस्थळी पुन्हा दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसपाटील नीतेश बागल, रघुवीर बागल, पांडुरंग शिंदे, गावातील तरुणांनी रस्त्यावर पडलेली मोठी फांदी बाजूला केली. याबाबत पोलिसपाटील बागल यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.