NEET 2026 Paper Leak How Kulkarni to Khairnar Link Emerged देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. कुलकर्णी रसायनशास्त्र विषयातील तज्ज्ञ असून, त्याने अनेक वर्षे नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये काम केले होते. अधिकृत गोपनीय माहितीचा गैरवापर करून त्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील आपल्या घरी खास कोचिंग सत्रे घेतल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, कुलकर्णीने विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय आणि उत्तरे डिक्टेट केली होती. हेच प्रश्न तीन मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत तंतोतंत आल्याचे तपासात समोर आले. या सत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच अटक झालेल्या मनीषा वाघमारे ही विद्यार्थ्यांना गोळा करण्यात मदत केल्याचे सीबीआयने सांगितले.
बेरोजगार तरुण झुरळांसारखे, चळवळीत जाऊन व्यवस्थेवर हल्ला करतात; सरन्यायाधीशांनी ज्येष्ठ वकिलाला फटकारलेगुरुवारी अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडे आणि पुण्यातील वाघमारे यांना अटक करण्यात आली. तपासात प्रश्नपत्रिका फुटण्याची साखळीही उघड झाली आहे. लोखंडे याला वाघमारेकडून पेपर मिळाला आणि त्याने तो नाशिकच्या शुभम खैरनारकडे दिला. खैरनारने पुढे यश यादवकडे पेपर पोहोचवला. यादवने तो इतरांकडे फिरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जयपूरमधील मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. गुरुग्राममधील यादव आणि नाशिकमधील खैरनार यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मंगीलाल बिवाल यांनी आपल्या धाकट्या मुलासाठी फुटलेला पेपर मिळवण्यासाठी १० ते १२ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. यादवमार्फत त्यांना ५०० ते ६०० प्रश्न पुरवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रश्न मिळाल्यास नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल, असे आश्वासन दिले गेले होते. सीबीआयने देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकून कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्याचाही प्रयत्न केला जात आहे.
'नीट' परीक्षा तीन मे रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एनटीएला सात मे रोजी गैरप्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आले.
क्लासचालकाची नऊ तास चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणात येथील एका महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आज येथील एका क्लासच्या चालकाकडे आपला मोर्चा वळवला. शुक्रवारी सकाळपासून या क्लासचालकाची त्यांच्याच फ्लॅटमध्ये सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. नऊ तास ही चौकशी चालली. त्यानंतर हे पथक फ्लॅटमधून निघून गेले. सध्या हे पथक लातूरमध्येच तळ ठोकून आहे.
तेलंगणाचे सीबीआयचे पथक दोन दिवसांपूर्वी येथे दाखल झाले होते. गुरुवारी (ता. १४) या पथकाने येथील एका महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याची चौकशी करून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास पुण्याला नेण्यात आले. तेथून दिल्लीला हलविले.
दरम्यान, येथील एका कोचिंग क्लासच्या संचालकाविरोधात एका पालकाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. यात सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा संदर्भ देत गेस पेपरमधील ४० प्रश्न 'नीट'च्या परीक्षेत कसे आले, याची चौकशी करावी, अशी मागणी या पालकाने केली होती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. यात त्यांनी संबंधित क्लासचालकासह चौघांचा जबाबही घेतला होता. त्याचाही तपास सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.