भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संबंधाची चर्चा होते तेव्हा ती फक्त दोन देशांचे राजकीय, रणनितीक संबंधापुरतेच ते मर्यादीत नसतात. दोन्ही देशांचे संबंध या पलिकडे आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातलं नातं रक्ताचं, कष्टाचं, घामाचं आणि तुरुंगांच्या चार भिंतीत आयुष्य जगलेल्या माणसांच्या स्वप्नांचं आहे. एकीकडे महात्मा गांधी आणि दुसरीकडे नेल्सन मंडेला, या दोघांच्या मधे एक शतकभराच्या आठवणी आहेत ज्या आजही दोन्ही देशवासियांच्या मनावर राज्य करतात.
उसाचे मळे आणि मजूर
ब्रिटीशांची राजवट असलेल्या नेटाल प्रांतात साधारण १८६०च्या आसपास ऊसाचे मळे असायचे. पण तिथं कामासाठी माणसं नव्हती. त्यावर उपाय म्हणून भारतातून मजूर आणायचे ठरले. करारबद्द मजूर म्हणून हजारो भारतीय समुद्र मार्गे दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. यात बहुतांश मजूर हे दक्षिण भारतातले होते. १८६० पासून १९११ पर्यंत भारतातून मजूर जाणं सुरूच होतं. जवळपास दीड लाख मजूर तिथं गेले, पण त्यातले बहुतांश मजूर परतलेच नाहीत. तिथं राहिले आणि दक्षिण आफ्रिकेतच भारतीय म्हणून राहिले.
खरंतर करारबद्ध मजूर म्हणून गुलामगिरीच लादली जात होती. दिवसभर मळ्यात राबराब राबायचं, कामामुळे आजारी पडलं तर कसलाच उपचार नाही. तक्रार करण्याची संधी नाही, केलीच तर त्याची शिक्षा मिळायीच. शिवाय वर्णभेदाचाही सामना करावा लागला. श्वेत वसाहतवाद्यांनी भारतीयांवर निर्बंध लादले होते. व्यापाराला बंदी, मतदानाचा अधिकार नाही. राहण्याच्या जागेवर बंधी होती. ब्रिटीशांची प्रजा पण त्यांना दुय्यम दर्जा दिला जायचा.
वकील ते महात्मा
दक्षिण आफ्रिकेत १८९३मध्ये मुंबईतला एक बॅरिस्टर व्यापारी खटल्यासाठी नेटाला इथं आला. एका रात्री पीटरमारित्झबर्गच्या रेल्वे स्टेशनवर प्रथम वर्गाच्या डब्यात प्रवास करताना वर्णद्वेषातून त्याला बाहेर फेकलं गेलं. त्याचा वर्ण काळा होता म्हणून त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. कडाक्याच्या थंडीत घडलेल्या या प्रकाराने तरुण जिद्दीला पेटला आणि हे सहन करायचं नाही असा निर्धार केला. त्या तरुणाचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधी.पुढे २० वर्षे गांधींन दक्षिण आफ्रिकेत असणाऱ्या भारतीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. दक्षिण आफ्रिकेतच त्यांनी सत्याग्रह, असहकार सुरू केला. त्यांच्या न्यायालयीन लढ्याला इथूनच सुरुवात झाली. नेल्सन मंडेलांनी गांधींबद्दल बोलताना म्हटलं होतं. "सत्याग्रहाचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या मातीतच झाला." गांधी १९१४ मध्ये भारतात महात्मा म्हणूनच परतले.
वर्णद्वेषाविरुद्ध भारताचा लढा
भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला तेव्हा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगाला संदेश दिला होता. भारत कधीच वर्णद्वेषाला मान्यता देणार नाही. नेहरूंचा तो संदेश फक्त शब्द नव्हते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेत 'अपार्थेड' धोरण चालत असे. अपार्थेड म्हणजे वंशानुसार विभाजनाचं धोरण होतं. भारत जगातला पहिला देश ठरला ज्याने १९४६ मध्येच दक्षिण आफ्रिकेशी व्यापारी संबंध तोडले. पुढे राजनैतिक, सांस्कृतिक आणि क्रीडा संबंधही संपुष्टात आले. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारतीय प्रतिनिधींनी अपार्थेडचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. भारताने हा मुद्दा इतका धरुन ठेवला की तब्बल १७ वर्षे हा मुद्दा UNच्या अजेंड्यावर राहिला.
चार दशकांनी नवी पहाट
दक्षिण आफ्रिकेनं अपार्थेड धोरणं १९९३ मध्ये रद्द केलं. त्यावेळी जोहान्सबर्ग इथं भारताचं सांस्कृतिक केंद्र सुरू झालं. नोव्हेंबर १९९३ला दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री पिक बोथा भारत दौऱ्यावर आल्यानंतर दोन्ही देशातले राजनैतिक संबंध पुर्ववत व्हायला लागले. वर्षभराने १९९४मध्ये जेव्हा नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा प्रिटोरियात भारतीय उच्चायोग उघडण्यात आलं.
नेल्सन मंडेला १९९५ला प्रजासत्ताक दिनी दिल्लीत मुख्य अतिथी म्हणून आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी १९९७ मध्ये लाल किल्ला घोषणा करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि दोन्हीही देशांनी धोरणात्मक भागिदारी जाहीर केली. भारताने नेल्सन मंडेला यांना 'भारतरत्न' आणि 'गांधी शांती पुरस्कार' देऊन गौरव केला. नेल्सन मंडेला यांनी म्हटलं होतं की, "भारत आणि दक्षिण आफ्रिका हे हृदयाने जोडलेले देश आहेत."
आजची स्थिती
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे देश BRICS आणि IBSA मध्ये एकत्र काम करतात. दोन्ही देशांमधील व्यापारी उलाढाल ही अब्जावधी डॉलर्सच्या घरात पोहोचला आहे. प्रिटोरियात 'गांधी-मंडेला सेंटर ऑफ आर्टिझन स्किल्स' उभारण्यात आलं आहे. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते भारतात आणले गेले आणि यातून नवे संबंध सुरू झाले.
एकेकाळी दीड लाख मजुरांपासून सुरू झालेले भारत - दक्षिण आफ्रिकेचे संबंध आज एका चांगल्या वळणावर पोहचले आहेत. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला हे दोघेही वेगवेगळ्या खंडातले असले तरी दोघांचं स्वप्न मात्र एकच होतं.
पुढील भाग : इथिओपिया — जिथे भारताने आफ्रिकेला पहिल्यांदा 'शिक्षक' म्हणून साथ दिली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.