Petrol and Diesel in Maharashtra: अस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकरी आधीच कर्जात बुडालेला आहे. निसर्गाच्या लहरीपणानं आधीच हैराण झालेला बळीराजा आता पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या (Petrol- Diesel Shortage) नव्या संकटामुळे पुरता हतबल झाला आहे. राज्यात अनेक भागात डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर बंद पडलेत. ज्याच्याकडे डिझेल इंजिननं पाणीउपसा होतो त्यांना आता पिकांना पाणी देता येत नाहीये. तर शेतमाल बाजारात नेण्यासाठीही शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसतोय. अशातच राज्यातील अनेक जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर सध्या इंधन टंचाई भयावह (Petrol- Diesel Shortage in Maharashtra) वास्तव समोर आलं असून आता नागरिकांच्या संतापाचाही कडेलोट होण्याची शक्यता आहे. (Petrol- Diesel Shortage)


Buldhana : सातव्या दिवशीही इंधन टंचाईच्या झळा, साठेबाजीमुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याचा प्रशासनाचा दावा


बुलढाणा जिल्ह्यात आज (20 मे) सातव्या दिवशीही इंधन टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीच्या मशागतीची कामे करू शकत नसल्याचे चित्र आहे. मान्सून तोंडावर असताना शेतकऱ्यांची कामे खोळंबल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर इंधन टंचाईमुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून जवळपास पंधरा ते वीस टक्के रस्ते वाहतूक कमी झाल्याचं समोर येत आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर रात्रभर शेतकरी व वाहनधारकांच्या रांगा बघायला मिळाल्या. मात्र बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून साठेबाजीमुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तर भाव वाढ होऊनही वीस ते पंचवीस टक्के इंधन विक्री वाढल्याचं प्रशासनाने म्हटले आहे.




Parbhani News : परभणीत सलग चौथ्या दिवशी डिझेल टंचाई कायम



परभणीत सलग चौथ्या दिवशी डिझेल टंचाई कायम आहे. शहरातील केवळ २ पंपावर डिझेल उपलब्ध आहे. जिथे डिझेल मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकीकडे कॅन घेवून पहाटेपासून रांगेत उभे आहेत. तर दुसरीकडे जवळपास २ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा या पंपावर लागल्या आहेत.


Bhnadara : भंडाऱ्यात डिझेलसाठी मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या लांब रांगा


आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपवर 'नो स्टॉक'चा बोर्ड बघायला मिळत असून विरली येथील एकमेव पेट्रोल पंपवर डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा सुरू आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर असून शेतीच्या मशागतीची कामं जोमात सुरू असल्यानं ट्रॅक्टरसाठी लागणारा डिझेल मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची पेट्रोल पंपवर मोठी गर्दी मध्यरात्रीपर्यंत उसळल्याचं चित्र बघायला मिळालं. तासनतास डिझेल मिळविण्यासाठी लांब रंगांमध्ये उभं राहून थकल्यानंतर शेतकऱ्यांनी डिझेल कॅन रंगांमध्ये लावून डिझेल मिळविले. उन्हाच्या असह्य झळा आणि त्यात डिझेलसाठी ताटकळत रात्रीपर्यंत शेतकऱ्यांना राहावं लागल्यानं रोष बघायला मिळत आहे.


इंधन बचतीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचा पुढाकार; प्रत्येक सोमवारी 'नो व्हेईकल डे' राहणार 


देशात इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद पुढे सरसावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी आणि कर्मचारी सायकल तसेच दुचाकीचा वापर करून कार्यालयात येणार आहेत. तसेच नागरिकांनीही पेट्रोल आणि डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे. वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय किती प्रभावी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



आणखी वाचा 


Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.