भारत आणि केनियाचे संबंध हे रेल्वे मार्ग बांधकाम आणि सागरी व्यापार यातून तयार झालेत. १८९८ मध्ये केनियात गुजरात आणि पंजाबमधील मजूर रेल्वेमार्ग बांधण्यासाठी ब्रिटिशांनी नेले होते. तेव्हा केनियातील त्सावो नदीच्या किनारी भारतीय मजुरांचा तंबू असायचा. त्या तंबूत अंधारी रात्र भयंकर असायची. कारण रात्रीच्या वेळी तंबूत शिरून दोन सिंह माणसांना फरफटत नेत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या माणसांचा मागमूसही सापडत नसे. जवळपास ९ महिने असं सुरू होतं. काम थांबल्यानंतर हजारो मजुरांनी तिथून पळ काढला. तंबूत शिरून माणसांना नेणाऱ्या त्या सिंहांना त्सावो मॅन-इटर्स म्हणून ओळखलं जातं. तिथं भारतीय मजूर मोंबासा ते युगांडा हा रेल्वे मार्ग बांधायला गेले होते. त्यांच्या घामातून आणि सांडलेल्या रक्तातूनच केनियाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला. India Kenya Relations From Railway Tracks to Freedom Struggle
वास्को द गामाला भेटलेला गुजराती
रेल्वे मार्गाच्या बांधणीपासून नव्हे तर त्याच्याही आधी साधारण १५व्या शतकाच्या शेवटी भारतीय व्यापारी केनियात असल्याचे उल्लेख आढळतात. १४९८मध्ये पोर्तुगीज नाविक वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या दिशेनं येत होता. त्याच्या भारताच्या शोधावेळी केनियाच्या मलिंदी किनारपट्टीवर एक गुजराती व्यापारी भेटला. त्याच व्यापाऱ्याने जहाज कालिकत बंदरापर्यंत न्यायला मदत केली होती. युरोपीय देशांना भारताचा शोध लावण्यासाठी एका गुजराती माणसाची महत्त्वाची भूमिका होती. मोंबासा आणि झांजिबारच्या किनाऱ्यावर शतकानुशतके भारतीय व्यापारी व्यापार करत होते. सिरॅमिक्स, मसाले, हस्तीदंत यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे. आता इतर गोष्टींचा व्यापार सुरू झाला पण दोन देशात असलेल्या संबंधाचा धागा मात्र तसाच आहे. केनिया आणि भारताला जोडणारा हिंदी महासागर हा नैसर्गिक पूल ठरला
भारत - इथिओपिया : २ हजार वर्षांचे संबंध; अडुलिस बंदर, नेहरूंची साथ ते मोदींचा गौरववेड्याचा उद्योग
ब्रिटिशांनी १८९५ला मोंबासा बंदर ते युगांडा रेल्वेमार्गाची महत्त्वकांक्षी योजना आखली होती. खरंतर हे साधं सोपं काम नव्हतं. जवळपास एक हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं काम करायचं होतं. तेव्हा विरोध करणाऱ्यांनी ही लूनॅटिक लाइन म्हणजेच वेड्याचा उद्योग म्हटलं होतं. ब्रिटिशांनी यासाठी तेव्हा भारतातून ३२ हजार मजूर आणले होते. यात बहुतांश पंजाबी शीख आणि गुजरातींचा समावेश होता. पूर्व आफ्रिकेचं तेव्हा अधिकृत चलन हे इंडियन रुपया होतं. भारतातले कायदेही तिथं लागू व्हायचे. 'ईस्ट आफ्रिका प्रोटेक्टोरेट' हे ब्रिटिश भारताचाच विस्तार होता.
त्सावोचे सिंह
रेल्वे मार्गाचं बांधकाम करताना अनेक आव्हानं असायची. मजूर मिळाले तरी त्यांना होणारे आजार, त्यांच्या जीवाला असलेला धोका यामुळे अनेक अडथळे यायचे. उकाडा, मलेरिया, आदिवासींचे हल्ले, त्सावोचे दोन सिंह यामुळे भीतीची टांगती तलवार सतत असायची. त्सावोच्या सिंहांनी तब्बल नऊ महिने रात्रीच्या अंधारात मजुरांची शिकार केली. यामुळे बांधकाम थांबलं, हजारो मजूर पळून गेले. अखेर प्रकल्प प्रमुख कर्नल पॅटर्सन यांनी डिसेंबर १८९८ मध्ये दोन्ही सिंहांची शिकार केली. आजही या सिंहांची कातडी शिकागोच्या फील्ड म्युझियममध्ये बघायला मिळते.
रेल्वेचं काम १९०१ मध्ये पूर्ण झालं. या कामाच्या काळात जवळपास अडीच हजार भारतीय मजुरांचा मृत्यू झाला. प्रत्येक मैलामागे चार माणसांचा जीव गेला. या मार्गाच्या कामानंतर जे काही वाचले त्यांनी केनियातच राहण्याचा निर्णय घेतला. काहीजण व्यापारी बनले, काही दुकानदार, वकील, डॉक्टरही झाले. पुढे जवळपास १९५० पर्यंत केनियातला ८५ टक्के व्यापार भारतीयांच्या हाती होता. पूर्व आफ्रिकन शिलिंगच्या नोटांवर गुजराती लिपीत आकडे छापले जात असत.
स्वातंत्र्यलढ्यात खांद्याला खांदा
केनियातील लोक ब्रिटिशांविरोधात लढत होते. तेव्हा भारतीयांनीही त्यांना साथ दिली होती. केनियातल्या कामगार चळवळीत मखन सिंग हे महत्त्वाचे नेते होते. तर एम ए देसाई आणि पियो गामा पिंतो यांनी स्वातंत्र्यासाठी पत्रकारितेचा आधार घेतला. १९५३ मध्ये भविष्यातले राष्ट्रपिता जोमो केन्याट्टा यांच्यावर खटला चालवला गेला. त्यावेळी भारतीय खासदार असलेल्या दिवाण चमनलाल यांनी वकील म्हणून काम केलं. त्यांच्यासोबत असणारे एफ आर एस डिसूझा हे नंतर केनियाचे उपसभापति बनले. भारत आणि केनिया यांचा स्वातंत्र्य लढा हा एकाच वसाहतवाद्याविरोधात होता. त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये एकता होती.
स्वातंत्र्यावेळीही भारत सोबत
केनियाच्या आधी भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंत १९४८मध्ये भारताने नैरोबीत कार्यालय उघडलं आणि अपासाहेब पंत यांना पहिले आयुक्त म्हणून नियुक्त केलं. भारताचे पहिले राष्ट्रपती एस राधाकृष्णन हे १९५६मध्ये केनिया दौऱ्यावर गेले होते. तर जेव्हा १९६३मध्ये केनियाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इंदिरा गांधी या स्वत: केनियाच्या स्वातंत्र्य सोहळ्याला उपस्थित होत्या. फक्त सौजन्य म्हणून नव्हे तर भावनिकदृष्ट्याही भारताची केनियाला साथ होती.
आजचं केनिया — भारताची साथ कायम
केनियात आजच्या घडीला जवळपा ८० हजार भारतीय वंशाचे लोक वास्तव्याला आहेत. केनियात भारत हा सर्वात मोठा दुसरा गुंतवणूकदार आहे. ६० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या केनियात आहेत. यात औषध, दूरसंचार, रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्राचा समावेश आहे. कोरोना काळातही भारताने केनियाला व्हॅक्सिन मैत्री अंतर्गत कोविशील्डचे ११ लाखांहून अधिक डोस दिले होते.आज केनियाच्या एल्डोरेट शहरात अपोलो हॉस्पिटलचं रुग्णालय उभं राहतंय. भारताने २०२४ मध्ये केनियाच्या नौदल तळावर सीटी स्कॅन यंत्र दान केलं होतं.
रेल्वे मार्ग बांधणीला गाळलेला घाम आणि सांडलेलं रक्त ते स्वातंत्र्य लढ्यात दिलेली साथ यातून भारत - केनिया यांचे संबंध दृढ झाले आहेत. दोन्ही देशांना जोडणाऱ्या हिंदी महासागरामुळे आज हे संबंध व्यापार, आरोग्य आणि संरक्षण या क्षेत्रातही कायम आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.