निसर्गतःच स्वच्छ, सुंदर दापोली तालुक्यात हर्णे बायपास मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अगदी सहज समुद्र दर्शन होईल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विचार करत २५ वर्षापूर्वी २ सनसेट पॉइंट उभारले होते. एक हर्णे महसुली गावच्या हद्दीत तर दुसरा अडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत. पर्यटकांच्या पसंतीच्या या दोन्ही सनसेट पॉईटची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे सनसेट पॉईंटवरून सृष्टीसौंदर्याची अनुभूती घेताना पर्यटकांना धोक्याच झाले आहे.
दापोली तालुक्याला स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टीसह निसर्गसृष्टी सौंदर्याचे अगदी भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे दापोलीत पर्यटकांचे येण्याचे दिवसेंगणिक प्रमाण खुपच वाढत चालले आहे. हर्णे बायपास मार्गाची २५ वर्षापूर्वी जेव्हा उभारणी झाली तेव्हा या मार्गाच्या जवळच एक हर्णे हद्दीत तर दुसरा अडखळ हद्दीत असे २ सनसेट पॉईंट सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधले. यातील पाजपंढरी गावाच्या माथ्यावरील हर्णे बायपास मार्गावरील अडखळ हद्दीत असलेला सनसेट पॉईंट हा पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेला सनसेट पॉईंट आहे. या सनसेट पॉईंटवरून सांयकाळी जेव्हा सूर्य मावळतीला जातो तेव्हाच्या सूर्यास्ताचे विलोभनिय दृश्य खरोखरच डोळयात साठविण्यासारखे असते. अशा या नयन सुख देणाऱ्या या दोन्हीही सनसेट पॉइंटची ठिकाणे दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आह
पूर्णपणे तुटलेले रेलिंग धोकादायक
हर्णे बायपास मार्गावरील या दोन्ही सनसेट पॉईंटवर पर्यटकांचा मोठा ओघ आहे. फोटो सेशनसाठी ही मोक्याची जागा असल्याने कुटुंबकबिल्यासह या ठिकाणी लोक येत असतात. सनसेट पॉईंटच्या तुटलेल्या रेलिंगमुळे कधीही अपघात होऊ शकतो. अशा या पाजपंढरीच्या माथ्यावरील आणि अडखळ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील सनसेंट पॉईंटवरुन समुद्राचे दिसणारे विहंगम दृश्य, हर्णे समुद्राच्या पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला, पाजपंढरी गावातील मनुष्य वस्तीतील दाटीवाटीची कौलारू घरे तेथील श्रीराम मंदिर पाजपंढरीतील वाट वळाचे रस्ते आणि सायंकाळच्या सुर्यास्ताच्या सोनेरी किरणांसह लाल तांबुस रंगाच्या छटा तसेच आंजर्ले गावातील निसर्ग रम्य नजारा पाहायला पर्यटनासाठी आलेल्यांसह स्थानिक देखील आवर्जून आपली उपस्थिती लावतात. त्यामुळे हा सनसेंट पॉईंट सुस्थितीत असणे आवश्यक आहे मात्र या सनसेंट पॉईंटचे पुर्णपणे रेलिंग तुटल्याने येथे येणे धोक्याचे झाले आहे. मात्र तरीही पर्यटकांचे या धोकादायक स्थितीतही येणे काही थांबत नाही त्यामुळे हे रेलींग पुन्हा नव्याने बसवण्याची मागणी होत आहे. तरच या सनसेंट पॉईंटवरून सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद येथे आलेल्यांना घेता येईल त्यामुळे या सनसेंट पॉईंटची झालेली दुरवस्था सुधारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घ्यावे अशा प्रकारची मागणी होत आहे.