भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2021-22 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय आजही चर्चेत असतो. आता तब्बल चार वर्षांनंतर कोहलीने त्या निर्णयामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. आरसीबी इनोवेशन लॅबमध्ये बोलताना त्याने सांगितले की, सततच्या दबावामुळे तो पूर्णपणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून गेला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला कसोटी मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेनंतर लगेचच कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आणि भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली. त्याआधीच त्याने टी-20 कर्णधारपद सोडले होते, तर वनडे संघाच्या नेतृत्वातून त्याला हटवण्यात आले होते.
कोहली म्हणाला, “माझ्यात काहीच उरले नव्हते. मी पूर्णपणे थकलो होतो. मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे संघाच्या फलंदाजीची जबाबदारी आणि कर्णधारपदाचा ताण दोन्ही माझ्यावर होते. भारतीय क्रिकेटला सर्वात वर ठेवण्याच्या ध्यासामुळे मी स्वतःकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे कर्णधारपद सोडेपर्यंत मी पूर्णपणे कोलमडलो होतो.”
त्याने पुढे सांगितले की, कर्णधारपद म्हणजे फक्त मैदानावरील निर्णय नसून खेळाडूंना समजून घेणे आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. “तुम्ही सतत अशा मानसिक स्थितीत असता की स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. गेल्या जवळपास 9 वर्षांत कुणीही मला विचारले नाही की ‘तू कसा आहेस?’,” असेही कोहलीने भावनिक होत सांगितले.
2014 मध्ये एमएस धोनी दुखापतीमुळे बाहेर असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत कोहलीने प्रथमच भारताचे नेतृत्व केले होते. त्यानंतर 2015 मध्ये कायमस्वरूपी कसोटी कर्णधार झाल्यानंतर त्याने श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका जिंकून दिली. रवी शास्त्री आणि कोहली यांच्या जोडीने भारतीय कसोटी क्रिकेटला नवी उंची मिळवून दिली.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पराभूत करत ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून कोहलीने 68 सामन्यांत नेतृत्व केले, त्यापैकी 40 सामने भारताने जिंकले. त्याचा विजयाचा टक्का 58.82 इतका प्रभावी राहिला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.