बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धर्माबाद तालुक्यात रविवारी सायंकाळी अक्षरशः हाहाकार माजवला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे तालुक्यातील विळेगाव थडी येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या शिवनाम सप्ताहाचा भव्य मंडप काही क्षणांत जमीनदोस्त झाला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


विळेगाव थडी येथे अधिक मासानिमित्त मोठ्या भक्तिभावात शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. गावात भक्तिमय वातावरण असतानाच अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तांडव सुरू केले.


जोरदार वाऱ्यामुळे उभारलेला मंडप अक्षरशः हवेत उडत कोसळला. मंडपाखाली ठेवण्यात आलेले अन्नधान्य, भांडी, ध्वनी व्यवस्था, पूजेचे साहित्य तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक स्वयंसेवक व ग्रामस्थांनी धावपळ करत साहित्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.


वादळ आणि पावसाच्या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे भाविकांची एकच तारांबळ उडाली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावताना दिसून आली. काही काळ संपूर्ण परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


दरम्यान, धर्माबाद तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला असून नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.


शेतकऱ्यांच्या उन्हाळी शेतीपिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. विशेषतः टरबूज, काकडी व भाजीपाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.