चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अण्णा द्रमुकच्या तीन बंडखोर आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यामुळं अण्णा द्रमुकच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 47 वरुन 44 वर आला आहे.  अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांच्या    गटाचे  नेते सी.वी. षणमुगम आणि एस.पी. वेलुमणी यांच्या गटातील आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी तामिळनाडूच्या विधानसभेचे अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांची भेट घेत राजीनामे सोपवले.


अण्णा द्रमुकच्या तीन आमदारांचे राजीनामे


अण्णा द्रमुकच्या राजीनामा देणारे आमदार टीव्हीकेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मदुरंथकम विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले एम.कुमारवेल, धारापुरम येथून विजयी झालेले सत्यभामा आणि पेरुंदरईतून विजयी झालेले जयकुमार या तिघांनी आमदारकीचे राजीनामे दिले आहेत. विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या तिघांनी टीव्हीकेचे मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली. यामुळं अण्णाद्रमुकचे राजीनामे देणारे तीन आमदार टीव्हीकेत दाखल होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. 


विधानसभा अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांनी अण्णाद्रमुकच्या तीन आमदारांचे राजीनामे स्वीकारले आहेत. अण्णाद्रमुकचे पक्षप्रमुख ई.के. पलानीस्वामी यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे इतर पाच आमदारांनी पुन्हा पलानीस्वामी यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सी.वी. षणमुगम यांनी या संदर्भात नंतर बोलणार असल्याचं म्हटलं. 


कुमारवेल, सत्यभामा आणि जयकुमार या तीन आमदारांनी आज राजीनामे दिले आहेत. हे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या विश्वासदर्शक ठरावावर पाठिंबा देणाऱ्या अण्णाद्रमुकच्या 25  आमदारांपैकी आहेत.  अण्णा द्रमुकचे एकूण 47 आमदार विजयी झाले होते. त्यापैकी 3 जणांनी राजीनामा दिला आहे. पाच आमदार पलानीस्वामी यांच्यासोबत गेल्यानं त्यांच्या गटात आता एकूण 27 आमदार झाले आहेत.  वेलुमणी गट सोडणाऱ्या आमदारांमध्ये एस.एम. सुकुमार यांचा समावेश आहे. अण्णाद्रमुकच्या बंडखोर गटातील आमदारांची संख्या 17 झाली आहे. पलानीस्वामी यांच्या गटात परत येणाऱ्या आमदारांमध्ये एस.एम. सुकुमार, पी. हरिबास्कर, दिलीपन जयशंकर, एन.एस.एन. नटराजन आणि  के. मोहन यांचा मसावेश आहे. 


चार जागांवर पोटनिवडणूक


विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 21 दिवसात अण्णाद्रमुकच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे द्रमुकला देखील फटका बसला आहे. कारण, त्यांचे मित्रपक्ष असलेले काँग्रेस,  व्हीसीके आणि आययूएमएल टीव्हीके सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अण्णाद्रमुकच्या तीन आमदारांनी राजीनामे दिल्यानं आणि मुख्यमंत्री विजय यांना एका जागेवरुन राजीनामा द्यावा लागणार असल्यानं तामिळनाडूत येत्या काळात चार जागांवर पोटनिवडणूक घ्यावी लागू शकते.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.