रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने आयपीएल 2026 च्या क्वालिफायर 1 मध्ये इतिहास रचला. धरमशाला येथे गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 254 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च प्लेऑफ धावसंख्या आहे. आता गुजरात टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी 255 धावांची गरज आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने अवघ्या 33 चेंडूंमध्ये 93 धावांची धडाकेबाज खेळी केली. विराट कोहलीने 25 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. आरसीबीने शेवटच्या सहा षटकांत 114 धावा केल्या.
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करून, आरसीबीने आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही प्लेऑफ सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यात 250 पेक्षा जास्त धावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आरसीबीची सुरुवात वादळी झाली. व्यंकटेश अय्यरने अवघ्या 7 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची मजबूत भागीदारी केली. कोहलीने 25 चेंडूत 43 धावा (5 चौकार, 1 षटकार) तर पडिक्कलने 19 चेंडूत 30 धावा केल्या.
रजत पाटीदारचे वादळी अर्धशतक!
या डावाचा खरा हिरो ठरला तो कर्णधार रजत पाटीदार. पाटीदारने अवघ्या 33 चेंडूंमध्ये नाबाद 93 धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि तब्बल 9 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याला कृणाल पांड्याने (28 चेंडूत 43 धावा) उत्तम साथ दिली. दोघांमध्ये चौथ्या गड्यासाठी 95 धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकांमध्ये जितेश शर्माने 5 चेंडूत नाबाद 15 धावा करत धावसंख्या 250 पार नेली.
गुजरातकडून जेसन होल्डरने 2 बळी घेतले, तर कागिसो रबाडाने 2 बळी घेतले असले तरी त्याने 54 धावा मोजल्या. मोहम्मद सिराज आणि कुलवंत खेजरोलिया अत्यंत महागडे ठरले. आता गुजरातच्या फलंदाजांना फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी आयपीएल इतिहासातील एक सर्वात मोठा यशस्वी पाठलाग करावा लागणार आहे.
हे ही वाचा-
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.