मद्यधुंद बस चालकाने स्कूटरला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणी जखमी झाली आहे. जोगेश्वरी येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ही घटना घडली. याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी बस चालकाला अटक केली आहे. प्रसाद सुरेश जाधव असे मयत चालकाचे नाव आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दीपेन जैन असे मयत तरुणाचे तर काजल मदेशिया असे जखमी तरुणीचे नाव आहे. दोघेही जुहू येथील हरे रामा हरे कृष्णा मंदिरात दर्शन घेऊन स्कूटरवरून जोगेश्वरीला येत असताना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर त्यांच्या स्कूटरला बसने मागून धडक दिली.
या अपघातात दीपेन आणि काजल हे दोघेही जखमी झाले. बसच्या चाकाखाली आल्यामुळे दीपेन गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दीपेनला मृत घोषित केले. काजलच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जोगेश्वरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. वैद्यकीय चाचणीत चालकाने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. काजल मदेशिया हिच्या तक्रारीवरून, पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.