मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अत्यंत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात बैठकीतच जोरदार जुंपल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. पक्ष नेतृत्वाच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे आणि पक्ष एकसंध ठेवणे यात आपण आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र आमच्यावर टीका सुरू असताना एकही नेता बचावासाठी पुढे आला नाही असा संताप यावेळी तटकरेंनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही आमच्या दोघांवर सतत टीका सुरू असताना पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही, अशा शब्दात तीव्र संताप सुनील तटकरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे. सुनील तटकरे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर बैठकीत कमालीचा तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Sunil Tatkare NCP Meeting : फक्त आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?


खासदार सुनील तटकरे यांनी बैठकीत पक्ष नेतृत्वासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तटकरे म्हणाले, “पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली, त्यावेळी देखील टीकेच्या तोंडी आम्ही दोघेच गेलो. मात्र इतर कुणीही आमची बाजू मांडली नाही अथवा बचावासाठी पुढे आले नाही. केवळ प्रफुल पटेल आणि मीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही अधिकृत भूमिका घेणार आहे की नाही?”


Chhagan Bhujbal Sunil Tatlare : भुजबळांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण…


सुनील तटकरे यांनी पक्षांतर्गत नाराजीवर सवाल उपस्थित केल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटकरे भुजबळांवर चांगलेच संतापले. भुजबळांना उत्तर देताना तटकरे यांनी, ‘मी आज या विषयावर बोलणारच आणि याबाबत पक्षात पूर्ण स्पष्टता यायला हवी,’ अशी ठाम भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.


विशेष म्हणजे, तटकरे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. सुनील तटकरे यांनी एवढी मोठी भूमिका मांडल्यानंतरही बैठकीत उपस्थित असलेल्या एकाही आमदाराने यावर भाष्य केलं नसल्याची माहिती आहे.


Praful Patel Absent : प्रफुल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर


या सर्व अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) हे मुंबईत हजर असताना सुद्धा या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि मुख्य पक्ष नेतृत्वात अंतर्गत वादावादी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील नाराजीचा सूर अद्याप कायम असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


NCP 288 Seats Preparation : छगन भुजबळांचा 2029 साठी थेट स्वबळाचा नारा!


याच बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी काळातील निवडणुकांबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. भुजबळ म्हणाले की, “2029 च्या निवडणुकीत भाजप (BJP) काय भूमिका घेईल याची काही खात्री नाही. त्यापेक्षा आपण राज्यातील सर्व 288 जागांची स्वतंत्र तयारी करायला हवी. भविष्यात मतदारसंघ वाढत असतील, तर त्याबाबत देखील आपण आतापासूनच आगामी प्लॅनिंग करायला हवे.”


Voter List SIR Process : ‘एसआयआर’ प्रणालीवर भुजबळांचा संशय


छगन भुजबळ यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, “सध्या राबवण्यात येणारी SIR ही एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी पारंपरिक मते पद्धतशीरपणे कमी करण्याचा डाव आखला गेला आहे. यावर वेळीच उपाययोजना करायला हवी.”


ही बातमी वाचा:




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.