राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशीचं वादळ पाहायाला मिळालं. वैभव सूर्यवंशीने सुरूवातीपासूनच षटकारांचा पाऊस पाडत अनेक विक्रम मोडित काढले. यादरम्यान टी-२० इतिहासात विश्वविक्रमी शतक करण्याची संधी मात्र अवघ्या ३ धावांनी हुकलं. वैभव सूर्यवंशी ९७ धावांवर बाद झाला आणि ख्रिस गेलचा अजून एक मोठा विक्रम अगदी थोडक्यात हुकला. प्रफुल्ल हिंगेने शतकाच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर असताना सूर्यवंशीला झेलबाद केलं.
वैभव सूर्यवंशीने एलिमिनेटर सामन्यात अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं. जे प्लेऑफच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठरलंं. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने ख्रिस गेलचा एका सीझनमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला. यानंतर सर्वात जलद शतक करण्याची संधीदेखील वैभव सूर्यवंशीकडे होती, पण तो २९ चेंडूत ९७ धावा करत बाद झाला.
प्रफुल्ल हिंगेच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी अखेर बाद झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. मैदान सोडायलाही तो तयार नव्हता. प्रफुल्लने ऑफ स्टंपबाहेर टाकलेल्या छोट्या आणि वाईड चेंडूवर वैभवने थर्ड मॅनवरून अपर कट खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू तो मैदानात कुठेही मारू शकला असता, पण यावेळी फटका नीट बसला नाही. सीमारेषेजवळ स्मरण रविचंद्रनने पुढे झुकत शानदार झेल घेतला आणि सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांनी व खेळाडूंनी सुटकेचा निश्वास टाकला. पण अवघं क्रिकेट जगत मात्र वैभवचं विक्रमी शतक हुकल्याने हळहळलं.
वैभव बाद होताच हैदराबादचे काही खेळाडू त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या पाठीवर थाप मारत त्याचं कौतुक केलं. वैभव ख्रिस गेलचा ३० चेंडूत शतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला होता, पण अगदी थोडक्यात तो हुकला. मैदानाबाहेर जाताना तो स्वतःवरच प्रचंड नाराज दिसला. डगआउटकडे जाताना त्याने स्वतःच्या डोक्यावर हातही मारला. वैभव सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूत तब्बल १२ गगनचुंबी षटकार आणि ५ चौकारांसह ९७ धावांची तुफानी खेळी केली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.