रत्नागिरी शहरातील कोकणनगर स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने पुढील सात तास मृतदेह विद्युतदाहिनीत अडकून पडला. स्मशानभूमीतील जनरेटर गेली सहा महिने बंद असून, त्याबाबत नगरपरिषदेचे अधिकारीच अनभिज्ञ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या मृतदेहाला मरणानंतरही यातना सोसाव्या लागल्या. याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगरपरिषदेत जाऊन नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांना जाब विचारत निवेदन दिले आहे.
सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर मृतदेह विद्युत दाहिनीमध्ये सरकवण्यात आला. मात्र, त्याच वेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्मशानभूमीत ठेवण्यात आलेला जनरेटर गेल्या सहा महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. त्यात नक्की काय तांत्रिक समस्या आहे, याचे ज्ञान पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना नसल्याने ऐनवेळी कोणतीही पर्यायी व्यवस्था करता आली नाही. मृतदेह दाहिनीच्या आत गेल्यामुळे तो बाहेर काढणेही शक्य नव्हते. यामुळे नातेवाईकांना अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी तब्बल सात तास ताटकळत वाट पाहावी लागली. या धक्कादायक प्रसंगानंतर संतप्त नागरिकांनी प्रशासकीय अनास्थेवर संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील बुधवारी शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना पत्र लिहून तीव्र निषेध नोंदवला. या पत्राद्वारे त्यांनी सहा महिन्यांपासून बंद असलेल्या जनरेटरमधील बिघाड शोधून तो तत्काळ दुरुस्त करण्यात यावा. स्मशानभूमीत अखंडित वीज पुरवठ्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी निधन पावलेल्या त्या व्यक्तीच्या नातेवाईकांची जाहीर माफी मागावी. तसेच या गंभीर हलगर्जीपणासाठी जबाबदार दोषींवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत.