अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात आहे. मात्र, संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच आखातातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेलाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. या युद्धाबाबत न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी परखडपणे आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी या युद्धाला विरोध केला असून एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे, असे म्हटले आहे.
ममदानी म्हणाले की, हे युद्ध तातडीने संपले पाहिजे, याची सर्वात मोठी किंमत सामान्य लोकांना मोजावी लागत आहे. याबाबत ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, तीन महिन्यांपूर्वी एक असे युद्ध सुरू झाले, ज्यासाठी कोणीही मतदान केले नव्हते. पण त्याची किंमत त्यांना मोजावी लागली ज्यांचा त्यात काहीही सहभाग नव्हता.
या युद्धात हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. या युद्धात झालेला प्रत्येक मृत्यू आणि अमेरिकेतील सामान्य कुटुंबांवरील पडलेला आर्थिक भार ही एका अविचारी निर्णयाची किंमत आहे. या युद्धाचा परिणाम केवळ युद्धक्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम सामान्य अमेरिकन नागरिकांवरही होत आहे.
ममदानी म्हणाले की, पेट्रोल आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या असून, त्यामुळे मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाचे बजेट कोलमडले आहे. अमेरिकेच्या संसदेच्या म्हणजेच काँग्रेसच्या मंजुरीशिवाय हे युद्ध सुरू करण्यात आले. त्यामुळे जनता एका अविचारी निर्णयाची किंमत आहे, असे ते म्हणाले.
ममदानी यांच्यासह अमेरिकी संसदेतील अनेक सिनेटरचाही या युद्धाला विरोध आहे. या युद्धामुळे अमेरिकेचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सामान्य जनतेवर याचा भार पडत आहे. त्यामुळे हे युद्ध तातडीने थांबवले पाहिजे, असे डेमोक्रॅटिक सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले. तसेच ट्रम्प प्रशासन सातत्याने चुकीचे निर्णय घेत आहे आणि हे युद्ध नियंत्रणाबाहेर जात आहे, असा धोकाही त्यांनी वर्तवला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.