हिंदुस्थानचे स्टार दुहेरी खेळाडू सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी आणि ध्रुव कपिला व तनिषा क्रास्टो यांनी शुक्रवारी सिंगापूर इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या सिंगापूर ओपन 2026 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकित सात्विक-चिराग जोडीने पहिल्या गेममधील पराभवानंतर शानदार पुनरागमन केले. त्यांनी 65 मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या लढतीत मलेशियाच्या कांग खाई झिंग आणि एरॉन ताई जोडीचा 19-21, 21-17, 21-13 असा पराभव केला. दुसऱ्या गेममधील चुरशीच्या लढतीनंतर हिंदुस्थानच्या जोडीने सामना तिसऱ्या गेममध्ये खेचला आणि तिथे पूर्ण वर्चस्व गाजवत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना जागतिक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कोरियाच्या किम वोन हो आणि सिओ स्युंग जे या जोडीशी होईल.
मिश्र दुहेरीमध्ये हिंदुस्थानच्या ध्रुव आणि तनिषा जोडीला पुढील फेरीत प्रवेश मिळाला, कारण मलेशियाच्या तिसऱ्या मानांकित चेन टांग जी आणि तोह ई वेई या जोडीने पहिल्या गेमदरम्यान दुखापतीमुळे किंवा अन्य कारणाने सामन्यातून माघार घेतली. अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी हिंदुस्थानी जोडीचा पुढील सामना जपानच्या युइची शिमोगामी आणि सायाका होबारा या जोडीशी होईल.
दुसरीकडे, एकेरीच्या सामन्यांमध्ये हिंदुस्थानला अपयशाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत, ‘ऑल इंग्लंड 2026’ चा उपविजेता लक्ष्य सेन याला 68 मिनिटे चाललेल्या तीव्र संघर्षात जपानच्या कोकी वातानाबेकडून 19-21, 21-15, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचे आव्हानही उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कोरियाच्या अॅन से यंगने 48 मिनिटांच्या चुरशीच्या सामन्यात 21-17, 21-14 असे पराभूत केले.