Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली असून ते भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या या उपोषणावर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले असताना त्याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, मनोज जरांगे हे भर उन्हात उपोषणाला बसले आहेत, असे सांगितले जात आहे. त्यांनी भर उन्हात उपोषण करायला नको होते. सरकारनेही त्यांना भर उन्हात उपोषण करण्यास परवानगी द्यायला नको होती, असे स्पष्ट मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी भर उन्हात आंदोलन करायचं मग नेत्यांनी जाऊन त्यांना भेटायचं हे व्हायला नको. त्यांना काही झालं तर त्यास सरकार जबाबदार असणार आहे, असेही पुढे नारायण राणे म्हणाले.
पुढे बोलताना, जरांगे यांना मी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही सरसकट आरक्षण मागू नये. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. हा फरक आजचा नाहीये. मराठ्यांना कुणबी करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, याला माझा विरोध आहे. जरांगे यांनी जो सरसकट शब्द काढून टाकावा. कुणब्यांना कुणबी समाजाचं आरक्षण द्यावं. त्यावर माझं काहीही म्हणणं नाही, अशी थेट भूमिका नारायण राणे यांनी घेतली. मराठ्यांनाही कुणबी करावं, याला माझा विरोध आहे, असे म्हणत सरकारही मराठ्यांच्या प्रश्नांना नेहमी विलंब करतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केले. जो-तो श्रेय घेण्यासाठीच मनोज जरांगे यांना भेटत आहे. मराठे या राज्यात 32 टक्के आहेत. त्यांचा प्रश्न अगोदर हाताळला पाहिजे, अशी गरजही राणे यांनी व्यक्त केली. दरम्यान, जरांगे उपोषणाला बसलेले असताना सरकार नेमका काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.