पोलीस असल्याची बतावणी करत दोन चोरट्यांनी आठ तोळे सोने लंपास केल्याची घटना चंद्रपूर शहरात घडली. याप्रकरणी अजय अडगुडवार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
चंद्रपूर शहरातील भानापेठ वॉर्ड परिसरात राहणारे अजय अडगुडवार हे नेहमीप्रमाणे सकाळी गांधी चौक परिसरातील एका दूध डेअरीत दूध घेण्यासाठी गेले होते. दूध घेऊन परत येत असताना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी त्यांना अडवले. पोलीस असल्याचे सांगत त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले. यानंतर अंगावर सोने घालण्यास मनाई असल्याचे सांगत सर्व सोन्याचे दागिने काढून वाहनाच्या डिकीत ठेवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून अडगुडवार यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून एका कागदात गुंडाळले आणि दुचाकीच्या डिकीत ठेवले. याच दरम्यान चोरट्यांनी हातचलाखीने दागिन्यांची पुडी बदलून त्यातील सोने लंपास केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
काही अंतर गेल्यानंतर अडगुडवार यांना संशय आल्याने त्यांनी डिकी उघडून पाहिली. त्यावेळी सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि डिकीत केवळ रिकामी कागदाची पुडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अडगुडवार यांनी तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.