नागपूर : भारताचं भवितव्य ज्याच्या खांद्यावर आहे तो हिंदू समाज मोठ्या प्रमाणात जागृत होत असून त्याचे चांगले परिणाम समोर येत असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामागे पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालाची किनार होती. जगभरात सध्या अशांतता आणि युद्ध सुरू आहे, अशावेळी जगाला भारताची गरज असल्याचंही ते म्हणाले. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या महत्त्वपूर्ण कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून देशातील प्रख्यात उद्योगपती आणि पद्मभूषण कुमारमंगलम बिर्ला उपस्थित होते. या वर्गात देशभरातून सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जागतिक परिस्थिती, हिंदू समाज आणि भारताच्या भूमिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले.


Mohan Bhagwat RSS Speech : भारत उभा राहील त्यावेळी वेगळी परिस्थिती


आज जग केवळ त्याचंच ऐकते ज्यांच्याजवळ शक्ती आहे, असं सांगत मोहन भागवत यांनी जागतिक महासत्तांच्या मनमानी कारभारावर कडक शब्दांत टीका केली. आपण पाहतोय की शक्तिशाली देश जगात आपलंच चालवतात, ते कोणाच्याही भूभागावर काब्जा करतात, कोणावरही बॉम्ब टाकतात आणि कमजोर देशांना या शक्तिशाली देशांचं ऐकावंच लागतं. मात्र भारत उभा राहील तेव्हा ही परिस्थिती बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Mohan Bhagwat On Global Situation : अशांत जगात भारताची वेळ आली आहे


भारताची वेळ आता आलीच आहे, असं स्पष्ट करत सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना आणि नागरिकांना आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, "जगामध्ये इतर ठिकाणी युद्ध सुरू असताना आपल्याकडे तेलाचे दर वाढत आहेत. परिस्थिती नेहमीच बदलत राहते, कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असते. अशा विपरीत परिस्थितीत केवळ संकटांकडे पाहण्याऐवजी आपल्याकडे स्वतःकडे काय सामर्थ्य आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे. अशांतता आणि युद्धात गुंतलेल्या या संपूर्ण जगाला आज भारताची अत्यंत गरज आहे."


Hindu Samaj Awakening : हिंदू समाज जागृत होतोय


सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू समाज आणि संघाच्या कार्यपद्धतीवर सविस्तर प्रकाश टाकला. भारताचे भवितव्य ज्यांच्या खांद्यावर आहे, तो हिंदू समाज आता मोठ्या प्रमाणावर जागृत होत आहे आणि त्याचे चांगले परिणामही देशात दिसून येत आहेत, असं ते म्हणाले. 


संघाने गेल्या अनेक दशकांत एक अशी वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती विकसित केली आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे जातीभेद पूर्णपणे नष्ट होऊन संपूर्ण हिंदू समाज एकसंध आणि संघटित झाला पाहिजे. हिंदू हा देशासाठी नेहमीच दायित्वशील राहिला आहे, असं ते म्हणाले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात समाजात जाऊन थेट सामान्य जनतेशी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधण्याचं काम संघाचे स्वयंसेवक अहोरात्र करत आहेत, असं मोहन भागवत म्हणाले. 


Mohan Bhagwat Speech : कार्य सुरूच राहणार


आपल्या प्रदीर्घ गुलामगिरीच्या इतिहासावर बोलताना सरसंघचालक म्हणाले की, "ज्यांनी आमच्यावर हजार वर्षे राज्य केले, ते आमच्यापेक्षा कुठल्याही बाबतीत सरस किंवा श्रेष्ठ नव्हते, उलट ते आमच्यापेक्षा कमीच होते. मुळात आम्ही आमच्याच काही श्रेष्ठ गोष्टी विसरलो, त्यामुळे आम्हाला हा पराभव स्वीकारावा लागला. आता आपल्याला तीच जुनी तयारी पुन्हा करावी लागणार आहे. संघ जे काही करत आहे, ते केवळ आणि केवळ देशासाठी करत आहे, स्वतःसाठी काहीही करत नाही. आमचं नाव इतिहासामध्ये नाही घेतलं गेलं तरी चालेल, पण देशाचं हित सर्वोच्च राहिलं पाहिजे."


Mohan Bhagwat On Anti India Elements : भारतविरोधी ताकद सक्रिय


भारतामध्ये अंतर्गत फूट निर्माण करणारे काही लोक आजही समाजात आहेत. या लोकांना भारताला प्रगतीपथावर पुढे जाऊ द्यायचे नाही आणि ते देशात सतत सक्रिय आहेत, असा इशारा डॉ. भागवत यांनी दिला.


भारत हा मुळातच एक धर्मप्रधान देश आहे. जेव्हा भारत आपली शक्ती कमकुवत देशांवर अन्याय करण्यासाठी न वापरता, जगातील सर्वांच्या हितासाठी वापरेल, तेव्हाच खरी जागतिक शांतता प्रस्थापित होईल. शेवटी आवाहन करताना ते म्हणाले की, लोकांनी संघात यावं, संघाला जवळून समजून घ्यावं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. तुमची इच्छा असल्यास गणवेश घालून शाखेत स्वयंसेवकासारखे या किंवा ते कठीण वाटत असल्यास संघाचे सहयोगी बनून देशकार्यात मदत करा.



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.