पाली - स्मार्ट मीटर बसवल्याच्या कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून, त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून 'हात-पाय तोडण्याची' आणि 'जिवे मारण्याची' धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सुधागड तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बालाजी प्रल्हादराव चात्रे यांच्या तक्रारीवरून पाली पोलिसांनी पेडली येथील राम मारुती पवार आणि दिनेश राम पवार या पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांचे जुने मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. बुधवार, दिनांक २७ मे २०२६ रोजी दुपारी उपकार्यकारी अभियंता बालाजी चात्रे हे आपल्या सहकाऱ्यांसह पेडली भागात आढावा घेण्यासाठी गेले होते. पेडली गावातील ग्राहक राम मारुती पवार यांनी नोटीस देऊनही जुने मीटर बदलू दिले नसल्याचे लाईनमनने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमाप्रमाणे जुने मीटर बदलून त्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले.
मीटर बदलल्याचा राग मनात धरून राम पवार आणि त्यांचा मुलगा दिनेश पवार यांनी सायंकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास भालगुल फाटा येथे शासकीय वाहनाने जाणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवले. "आमचा जुना मीटर आत्ताच्या आत्ता परत लावा," असे म्हणत राम पवार यांनी थेट उपकार्यकारी अभियंता चात्रे यांच्या शर्टाची कॉलर पकडली आणि त्यांना धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता दोघांनी चात्रे यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्या चारचाकी गाडीकडे ओढत नेण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पेडली मुख्य रस्त्यावरील जैन मंदिरासमोर पुन्हा शासकीय वाहन थांबवून चात्रे यांची कॉलर पकडली आणि पॅन्टचे बक्कल खेचले. जुने मीटर परत नाही बसविले तर तंगड्या तोडेन, तुला जिवे ठार मारेन, अशी धमकी दिली.
या गंभीर प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लाईनमनने वाद मिटवण्यासाठी जुने आणि नवीन दोन्ही मीटर सिरीजमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिता-पुत्रांनी नवीन सिरीज मीटर लावण्यासही तीव्र विरोध केला. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना धाक दाखवून, बलप्रयोग करत शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी उपकार्यकारी अभियंता बालाजी चात्रे यांनी पाली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी पितापुत्रविरुद्ध यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (SI) सचिन माधवराव निकम करत आहेत.
याबाबत संबंधित पितापुत्रांनी पोलीस स्थानकात वीज महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील तक्रारी अर्ज केला आहे. यामध्ये वीज महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घरात कोणीही नसताना वीज मीटर बदलले असल्याचे नमूद केले आहे. तसेच वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिव्या दिल्याचे म्हटले आहे. व ऍट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.