पाचोड - पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरात शनिवारी (ता. सहा) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. काही काळ सुरू असलेल्या या नैसर्गिक तडाख्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या, काही झाडे उन्मळून पडली, तर घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या.
पाचोड येथील नानासाहेब शेळके यांच्या घरावर लिंबाचे झाड उन्मळून पडल्याने घराच्या काही भागाचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांच्या सहकार्याने झाड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. पाचोडसह मुरमा, कोळी बोडखा, थेरगाव , वडजी, लिंबगाव, रांजनगाव दांडगा, खंडाळा आदी ठिकाणी तिन मिनिटे हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडून फळबागांची मोठी नुकसान झाली.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी महावितरणचे खांब आणि झाडे कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता.
दरम्यान, या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार असून, शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागतील. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
मात्र, या पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे आंबा व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळी हंगामात पेरणी करून सोंगणीस आलेल्या बाजरी व सोयाबीन पिकांनाही फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.