पुणे - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या या आघाडीने सर्व १४ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.


दहा वर्षांनंतर झालेल्या या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर सोमवारी जाहीर करण्यात आला. निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या नेतृत्वाखालील ‘चित्रकर्मी’ पॅनेल आणि अपक्ष आघाडी असे तीन पॅनेल रिंगणात होते. महामंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ‘समर्थ’ पॅनेलच्या उमेदवारांनी सर्व १४ जागांवर विजय मिळवत ही लढाई एकतर्फी जिंकली.


मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या समर्थ पॅनेलमधील विजयी उमेदवारांमध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे यांचा समावेश आहे. याच पॅनेलमधील आनंद शिंदे आणि विजय खोचीकर यांची यापूर्वी बिनविरोध निवड झाली आहे. तर ‘चित्रकर्मी’ पॅनेलच्या प्रमुख वर्षा उसगांवकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.


मेघराज राजेभोसले यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती निश्चित


निवडणुकीत निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संगीत दिग्दर्शक, वितरक, तंत्रज्ञ अशा विविध घटकांच्या १७ जणांचे प्रतिनिधी मंडळ निवडले गेले आहे. यांच्यातून अध्यक्षांसह कार्यवाह, उपाध्यक्ष, खजिनदार असे विविध पदाधिकारी निवडले जातात. त्याची बैठक येत्या शुक्रवारी (ता. १२) होणार आहे. प्रतिनिधी मंडळात समर्थ पॅनेलला स्पष्ट बहुमत असल्याने मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचीच अध्यक्षपदी फेरनियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे.


निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून आमच्यावर अनेक बेछूट आरोप करण्यात आले. मात्र आजच्या निकालातून महामंडळाच्या सभासदांनी ते सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले असून, गेल्या दहा वर्षांत आम्ही केलेल्या कामावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी काळातही सर्व घटकांना सोबत घेऊन महामंडळाच्या विकासासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहू.


- मेघराज राजेभोसले, प्रमुख - समर्थ पॅनेल

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.