पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी महापालिकेने वृक्षतोडीची जाहीर नोटीस मागे घेतली आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीविरुद्ध तक्रार करण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज दिली.
गणेशखिंड रस्त्यावरील विकासकामे आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज (ता. ९) ऑनलाइन बैठक झाली. या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मेट्रोचे मुख्य अभियंता योगेश कुलकर्णी आणि पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते.
शहरात बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी महापालिकेने शुक्रवारपर्यंत अधिकृत हेल्पलाइन सुरू करावी, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली. ही सूचना आयुक्तांनी मान्य केली आहे.
रस्त्याचे अंतिम डिझाइन निश्चित झाल्यानंतरच वृक्षतोडीबाबत नव्याने प्रक्रिया राबवली जाईल, असे राम यांनी स्पष्ट केले. केवळ अंतर्गत समित्या नेमण्यापेक्षा नागरिकांच्या सूचना व हरकतींवर खुली चर्चा करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून, शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.