पुणे - खराडी भागात सुमारे १४ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘चाइल्ड हेल्पलाइन’ आणि महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अंगणवाडी सेविकेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका १४ वर्षे पाच महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह गतवर्षी २८ मार्च रोजी एका तरुणासोबत (वय २७, रा. चंदननगर) लावून देण्यात आला होता.
हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांच्या आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत झाला होता. या बालविवाहाची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना एका पत्राद्वारे प्राप्त झाली होती. त्यानंतर ‘चाइल्ड हेल्पलाइन’चे स्वयंसेवक आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी केली. त्यात संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिचा विवाह लावून दिल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याची आई, भाऊ आणि अन्य नातेवाईक अशा एकूण नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खराडी पोलिस करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.