नाशिक - बारा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून जनतेच्या सेवेसाठी आपण सज्ज आहात. प्रत्यक्ष पोलिसिंग करीत असताना भिन्न-भिन्न स्वरूपाची आव्हाने समोर आहेत. त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करीत असताना विवेकबुद्धी जागरूक असावी. तुमच्याकडे येणारा अन्यायाने पीडित असून, त्याची न्यायाची अपेक्षापूर्ती करण्याचे तुम्हीच एकमेव माध्यम आहात, याचा विश्वास पीडिताला असायला हवा. त्यासाठी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पणाची भावना ठेवून कर्तव्य बजावण्याचा संदेश पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी दिला.


त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२७ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या तुकडीने मानवंदना दिली. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना करंडक प्रदान करीत गौरविण्यात आले.


पोलिस महासंचालक दाते म्हणाले, की प्रशिक्षणार्थी आजपासून प्रत्यक्ष पोलिस सेवेत जात असून, बाह्यजगतातील आव्हाने मोठी आहेत. सायबर, आर्थिक गुन्हेगारीत वाढ झाली असून, त्या गुन्ह्यांना सामोरे जाताना कालसुसंगत ज्ञान आत्मसात करणेही गरजेचे आहे. अमली पदार्थांचे आव्हान असून, त्याविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा आहे.


गडचिरोलीत कर्तव्य बजावताना वॉरमोडमधून सर्व्हिस मोडमध्ये कामकाज करावे लागणार आहे. कट्टरतावाद्यांपासून जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यासाठी अविरत सतर्कता बाळगावी लागणार आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता लोकाभिमुख, नि:पक्ष सेवा बजाविण्याची जबाबदारीची अपेक्षाही दाते यांनी व्यक्त केली.


अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाचा आढावा घेतला. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १२७ व्या तुकडीचे प्रशिक्षण नऊ जून २०२५ पासून सुरू झाले होते. या तुकडीत एकूण ५८३ प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.


प्रशिक्षणार्थी


पुरुष - ४२०


महिला - १६३


एकूण - ५८३

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.