मंचर : चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पातील वीज उपकेंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या जमिनीत वीज खांब उभारण्याच्या प्रयत्नाला ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १२) तीव्र विरोध केला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरणचे ठेकेदार, कर्मचारी तसेच पोलीस पथकाला माघारी फिरावे लागले.


ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील गायरान जमिनीत सौर प्रकल्प उभारताना प्रकल्प एका बाजूने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी शांततापूर्ण आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करून मोठ्या पोलीस बंदोबस्तात गायरान जमिनीत सौर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले.


आता या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज उपकेंद्रापर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत वीजखांब उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांकडून दमदाटी व दहशतीचे वातावरण निर्माण करून काम केले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.


यावेळी उपसरपंच अमोल दाभाडे, उद्योजक मनोहर इंदोरे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संजय इंदोरे, बाबाजी इंदोरे, रमेश थोरात, माणिक गांजाळे, हरिभाऊ थोरात यांच्यासह महिला शेतकरीही घटनास्थळी उपस्थित होत्या.


"पोलिसांनी अटक केली तरी चालेल, पण आमच्या खासगी मालकीच्या जमिनीत वीजखांब उभारू देणार नाही," असा इशारा ग्रामस्थांनी दिला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून पोलीस पथकानेही माघार घेतली.


दृष्टीक्षेप:


• मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत चांडोली खुर्द येथे सौर प्रकल्प उभारणी


• गायरान जमिनीत प्रकल्प उभारतानाही ग्रामस्थांनी केला होता विरोध


• खासगी जमिनीत वीजखांब उभारण्याच्या प्रयत्नाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध


• महावितरणचे ठेकेदार, कर्मचारी आणि पोलीस पथकाला माघारी फिरावे लागले


• "अटक झाली तरी चालेल; खासगी जमिनीत खांब उभारू देणार नाही" ग्रामस्थांचा इशारा


• गावातील महिला शेतकऱ्यांचाही आंदोलनात सक्रिय सहभाग

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.