मंचर : पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्ग आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातूनच जावा, यासाठी परदेशातील काही तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून खोडद येथील जागतिक दुर्बीण (जीएमआरटी) प्रकल्पामुळे या मार्गाला कोणताही तांत्रिक अडथळा निर्माण होणार नसल्याचा त्यांचा प्राथमिक अभिप्राय असल्याची माहिती राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.


मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी (ता. १४) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, ऍड प्रदीप वळसे पाटील, कैलासबुवा काळे उपस्थित होते.


वळसे पाटील म्हणाले, ‘‘बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सध्या ६०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत विविध कामे सुरू आहेत. भविष्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग या भागातून होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे.’’


खोडद येथील जागतिक दुर्बिणीला कोणताही तांत्रिक अडथळा निर्माण होणार नसल्याबाबत काही तज्ज्ञ हमी देण्यास तयार असल्याचे सांगत त्यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार असून त्यानंतर सुधारित अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


सुमारे २३१ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मंचर, नारायणगाव, आळेफाटा, राजगुरुनगर, चाकण, संगमनेर आणि सिन्नर या प्रमुख स्थानकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.


डिंभे धरणाचे पाणी वळविण्याच्या बोगद्याला आजही विरोध


हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणातील पाणी बोगदा खोदून जामखेड तालुक्याकडे वळविण्याच्या प्रस्तावाला आपला पूर्वीप्रमाणेच आजही ठाम विरोध असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.


‘‘यासंदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून बोगद्याच्या कामाला विरोध दर्शविला होता. त्याच चर्चेची आठवण मी शनिवारी भीमाशंकर येथे आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस आणि रविवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना करून दिली आहे. यासंदर्भात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे,’’ असे ते म्हणाले.


‘‘या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी बोगदा पाडण्यास कालही माझा विरोध होता आणि आजही तो कायम आहे. मी दहा वर्षे अहिल्यानगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, मात्र त्या काळात पाण्यावरून कधीही संघर्ष निर्माण झाला नव्हता,’’ अशी आठवणही त्यांनी करून दिली.


- पुणे-नाशिक रेल्वे मार्ग मूळ आराखड्यानुसार व्हावा, अशी भूमिका


- खोडद येथील जागतिक दुर्बीण प्रकल्प अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा अभिप्राय


- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक


- सुधारित अहवालानंतर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळण्याची अपेक्षा


- भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत ६०० कोटींची कामे सुरू


- डिंभे धरणाचे पाणी वळविणाऱ्या बोगद्याला आजही ठाम विरोध

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.