पुणे - दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध कॉम्रेडस या आव्हानात्मक मॅरेथॉनमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये पुण्याच्या तीन खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली आहे. त्यात प्रसिद्ध अल्ट्रा धावपटू आणि कोच योगेश सानप यांनी ८५.७७ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ६ तास ५९ मिनिटे ५७ सेकंद अशी शानदार वेळ नोंदवत कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या इतिहासातील सर्वात वेगवान भारतीय होण्याचा मान मिळवला.
नुकत्याच झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सानप (योसा) यांनी नवीन भारतीय राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्यासमवेत सार्थ साबळे यांनी ७ तास १५ मिनिटे ०८ सेकंद तर डॉ. योगेश सातव यांनी ७ तास २४ मिनिटे ४६ सेकंद अशी वेळ नोंदवत कॉम्रेड्स मॅरेथॉनमधील अनुक्रमे दुसरे आणि तिसरे वेगवान भारतीय धावपटू म्हणून आपले नाव नोंदवले.
‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ म्हणून ओळखल्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये यंदा जगभरातून सुमारे २१ हजार ६३३ धावपटू सहभागी झाले होते. यंदाची कॉम्रेड्स मॅरेथॉनची ९९ वी आवृत्ती असून ती डर्बन ते पीटरमॅरिटझबर्ग दरम्यानची ‘अप रन’ (चढणीची शर्यत) होती, ज्यामध्ये पाच मोठ्या टेकड्यांचा समावेश होता.आंतरराष्ट्रीय अल्ट्रा-रनर असोसिएशन (आयएयू) च्या माहितीनुसार, पुरुषांमध्ये जॉर्ज कुशे यांनी ५ तास १५ मिनिटे ५६ सेकंदांच्या नव्या ‘अप रन’ रेकॉर्डसह, तर महिलांमध्ये गेर्डा स्टेन यांनी ५ तास ४९ मिनिटे ४६ सेकंदांसह प्रथम क्रमांक पटकावला.
तीन वेळा बोस्टन मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेल्या सानप यांनी जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत मानाची समजली जाणारी ही अल्ट्रा-मॅरेथॉन ७ तासांच्या आत पूर्ण केली. याद्वारे त्यांनी या स्पर्धेत यापूर्वीचा सर्वात वेगवान भारतीय असण्याचा देवराव चौधरी यांचा विक्रम मोडला.
प्रति किलोमीटर ४.५४ मिनिटे अशा उत्कृष्ट वेगाने ही शर्यत पूर्ण करणाऱ्या ३९ वर्षीय सानप यांनी सांगितले की, ‘विक्रम मोडल्याची भावना अजूनही मनाला पूर्णपणे पटत नाहीये, हे सर्व एका स्वप्नासारखे वाटत आहे. मी दर आठवड्याला किमान २६० किलोमीटर धावण्याचा सराव करायचो, ज्यामध्ये स्पीड सेशन्स, हिल ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश होता. मला दुखापतींपासुन दूर ठेवण्यात माझ्या फिजिओथेरपी टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व प्रयत्नांमुळेच मी ७ तासांचा टप्पा पार करू शकलो.’
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.