नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची (Food Safety Regulations) काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ फूड-ग्रेड, विषमुक्त आणि गंजरोधक (Rust free) सुरी, ब्लेड तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे.


काही अन्न व्यवसायांमध्ये गंजलेल्या, तडे गेलेल्या, खराब झालेल्या अथवा रंग लावलेल्या सुरी व कापण्याच्या साधनांचा वापर होत असल्याचे 'एफएसएसएआय'च्या निदर्शनास आले आहे. अशा उपकरणांमुळे अन्नामध्ये भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण (Contamination) होण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.


FSSAI New Directives : अन्न व्यवसायांसाठी जारी झालेल्या मार्गदर्शक सूचना


अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरणाने खालील बाबींवर विशेष भर दिला आहे:


फूड-ग्रेड उपकरणांचा वापर : अन्न तयार करणे, प्रक्रिया करणे, पॅकिंग करणे आणि साठवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा दर्जा 'फूड-ग्रेड' (Food grade Quality) असणे आवश्यक आहे.


स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण : अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या सर्व पृष्ठभागांची आणि उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण (Sanitization) आणि योग्य देखभाल करणे अनिवार्य आहे.


दोषी साधने बदलणे : गंज, तडे, रंग निघणे किंवा इतर कोणतेही दोष असलेली उपकरणे अन्न व्यावसायिकांनी तात्काळ बदलणे गरजेचे आहे.


FSSAI Strict Action : नियम मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई


FSSAI ने स्पष्ट केले आहे की, या नवीन सुरक्षा निर्देशांचे उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 (Food Safety and Standards Act, 2006) अंतर्गत संबंधित व्यवसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.


देशभरातील सर्व राज्य अन्न सुरक्षा आयुक्त, परवाना प्राधिकरणे आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना (Food Safety Officers) आपापल्या भागात हॉटेल व अन्न निर्मिती केंद्रांची तपासणी करताना विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.


ही बातमी वाचा:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.