कुंभार पिंपळगाव. जि. जालना - अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून गुरूवारी (ता. १८)अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने गावात भेट देऊन किराणा दुकान, स्वीट मार्ट, दुध डेअरी आदि सात दुकानांची पाहणी करून तपासणी केली. किराणा, दुध, फरसाण यासह नऊ विविध मालाचे नमुने घेतले, हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत.



दरम्यान, अनेक दुकानदारांकडे परवाने आढळले नाहीत. तर बाजारातील अनेक व्यापाऱ्यांनी पथक गावात येताच पळ काढला, तर दुसरीकडे पथकाला पाहण्यासाठी, काय कारवाई केली हे पाहण्यासाठी दुकानांपुढे जणू जत्राच भरली होती.


अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकारी डॉ. अनुजा नगरारे, नमुना सहाय्यक धम्यदीप नरवडे यांच्या पथकाने गुरुवारी गावातील किराणा दुकान, दुध डेअरी, स्वीट मार्ट आदी ठिकाणी पाहणी करून मालाचे नमुने घेतले. दरम्यान पथक येताच गावातील अनेक दुध डेअरी, मेडिकल दुकान, किराणा दुकान, स्वीट मार्ट, पानटपऱ्या, डेलीनीड्स दुकानदारांनी दुकाने बंद करून पळ काढला, तर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला.


दरम्यान तपासणी केलेल्या दुकानातील मालाचे, खाद्यपदार्थांचे विविध नमुने घेऊन हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. अनेक दुकानदारांकडे दुकानाचे परवाने आढळले नाहीत या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.


बघ्यांची एकच गर्दी-दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर लोकांत प्रचंड उत्सुकता असल्याने पथकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावर जणू जत्राच भरली होती. पथक रात्री परत फिरताना पथकाच्या वाहनांच्या बाजूने लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनाही तपासणी करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.