पुणे - खडकवासला धरणाखालील मुठा नदीवर असलेल्या आणि खडकवासला-शिवणे परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाच्या दुरुस्ती व बळकटीकरणाचे काम पुणे महापालिकेने पूर्ण केले आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून केलेल्या या कामामुळे पुलाचे आयुर्मान वाढले असून, पुढील १० ते १५ वर्षे वाहतुकीसाठी हा पूल सुरक्षित झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खडकवासला व शिवणे परिसराला जोडणारा हा १६० मीटर लांबीचा आणि ६.५० मीटर रुंदीचा पूल १९६५ मध्ये बांधण्यात आला आहे. पुलाचे वय ५० वर्षांहून अधिक झाल्याने महापालिकेने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यामध्ये पुलाची काँक्रीट क्षमता एम-१५ ते एम-१७ पर्यंत घसरल्याचे समोर आले होते. पुलाची दुरवस्था लक्षात घेऊन तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले.
धरणाच्या खाली असल्याने पाण्याचा तीव्र प्रवाह पुलाच्या खांबांवर सतत आदळत असतो. हा परिणाम विचारात घेऊन पिलर्सचे जॅकेटिंग करण्यात आले आहे. तसेच खराब झालेला काँक्रीटचा भाग काढून अत्याधुनिक पॉलिमर मॉर्टरचा वापर करून काँक्रीट पुनर्संचयन करण्यात आले. पुलाच्या स्लॅब आणि पिलर्सची ताकद वाढवण्यासाठी इपॉक्सी ग्राउटिंगची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
या कामांतर्गत अबेटमेंट व विंग वॉलची विशेष दुरुस्ती, पुलाच्या दोन्ही बाजूंना चेनलिंक फेन्सिंग, री-सरफेसिंग आणि आवश्यक दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. वाहतूक सुरक्षेसाठी खडकवासला बाजूला आधुनिक डब्ल्यू-बीम क्रॅश बॅरियरही बसविण्यात आले आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते. आता अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा पूल लवकरच जड वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांच्या नियंत्रणाखाली हे काम पूर्ण झाले. पुलाच्या बळकटीकरणामुळे खडकवासला, शिवणे आणि परिसरातील हजारो नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.