पुणे - जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढग आणि उन्हाचा लपंडाव सुरू असला, तरी प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तसेच पुढील तीन दिवस देखील पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
शहर आणि परिसरात गुरुवारी सकाळपासूनच आकाश अंशतः ढगाळ होते. अधूनमधून ढगांची दाटी होत असल्याने पावसाची चिन्हे दिसत होती. मात्र दुपारच्या सुमारास कडक ऊन पडल्याने उकाड्यात भर पडली. सायंकाळी पुन्हा आकाशात ढग जमा झाले; परंतु पावसाच्या सरी कोसळल्या नाही. त्यामुळे पुणेकरांना दिवसभर ऊन-सावलीचा खेळ अनुभवावा लागला.
गुरुवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसून शहरात उष्णता आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवस पुणेकरांना पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. १९) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर २४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. २०) कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.