कात्रज - कात्रज घाट परिसरातील वनक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मेडिकल वेस्ट आणि बांधकामातील राडारोडा टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. घाट परिसरातील वनपरिक्षेत्रात मागील दहा वर्षांपासून विविध प्रकारचा कचरा टाकला जात आहे.
मुख्य रस्त्यांपासून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरील परिसरातच काचेच्या औषधांच्या बाटल्या, प्लास्टिकच्या औषधांच्या बाटल्या, वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर धोकादायक मेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणावर आढळून येते. जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कात्रज घाट हा जैवविविधतेने समृद्ध असा परिसर मानला जातो. येथे विविध प्रकारचे वन्यप्राणी, पक्षी आणि वनस्पती आढळतात. अशा भागात मेडिकल वेस्ट आणि इतर कचरा टाकला जात असल्याने वन्यजीवांच्या आरोग्यावर तसेच संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
हद्दीचा वाद पर्यावर्णाचा ऱ्हास
कचरा टाकण्यात येत असलेला भाग हा वन विभागाच्या हद्दीत येतो. मात्र, हा कचरा महापालिका हद्दीतील लोक टाकतात. वनविभागाकडे कचरा साफ करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही आणि महापालिका हा भाग आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगून हात वर करत असल्याने हा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.
प्रतिक्रिया -
कात्रज घाटातील वनक्षेत्रातील सर्व कचरा हटवून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पुढील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. या भागात नियमित देखरेख, सीसीटीव्ही यंत्रणा, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई आणि संपूर्ण परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात यावी.
- अॅड. प्रभाकर तोडकर, स्थानिक नागरिक
कात्रज घाट आणि वनपरिक्षेत्र हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी आम्ही सातत्याने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करतो. पंरतु कचरा टाकणारे लोक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. तरीही आमची आता सीसीटीव्ही बसविण्याबाबत आणि सुरक्षारक्षक नेमण्याबाबत चाचपणी सुरु आहे.
- नंदकिशोर पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.